धोनी नाही तर विजय नाही; हैदराबादेत चेन्नई पराभूत!

David Warner of Sunrisers Hyderabad
डेव्हिड वॉर्नर

सनरायजर्स हैदराबादविरूद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात कॅप्टन कूल अर्थात महेंद्र सिंह धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची अवस्था त्यांच्या ‘किंग’शिवाय लढणाऱ्या सेनेसारखी झाली. पाठीच्या दुखण्यामुळे धोनीला संघाबाहेर बसावं लागल्यामुळे २०१०नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल ९ वर्षांमध्ये पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्ज धोनीच्या नेतृत्वाशिवाय खेळत होती. आणि त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला. रैनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम धोनीला सनरायजर्स हैजराबादकडून पराभव पत्करावा लागला. यंदाच्या मोसमातला हा त्यांचा दुसरा पराभव आहे. मात्र, ८ सामन्यांमधून १४ पॉइंटसह धोनीची टीम पॉइंट टेबलमध्ये टॉपला असल्यामुळे या पराभवाचा गुणतालिकेत त्यांना मोठा असा फटका बसणार नाही.

सुरेश रैनानं टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे ओपनर शेन वॅटसन आणि फॅफ डू प्लेसिस यांनी तो सार्थ ठरवत ७९ रनांची पार्टनरशीप देखील करून दिली. नदीमनं वॅटसनचा धोकादायक अडथळा पार केला तेव्हा त्याचे ३१ रन झाले होते आणि टीमच्या दहाव्या ओव्हरमध्ये ७९ धावा पूर्ण झाल्या होत्या. ११व्या ओव्हरमध्ये विजय शंकरनं फॅफ डू प्लेसिसला ४५ रनांवर आऊट केलं. दोघे सलामीवीर माघारी परतल्यानंतर मात्र चेन्नईचा डाव आकार घेऊ शकला नाही. सुरेश रैना(१३), केदार जाधव(१) आणि धोनीच्या जागेवर विकेट कीपर म्हणून टीममध्ये आलेला सॅम बिलिंग्ज(०) या मधल्या फळीतल्या बॅट्समन्सला फारशी कामगिरी करता आली नाही. १५व्या ओव्हरमध्ये चेन्नईच्या अवघ्या १०१ रनांवर ५ विकेट पडल्या होत्या.

बिलिंग्ज आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या रविंद्र जडेजाकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, त्याने चक्क २० बॉल खाऊन फक्त १० रनांची भर घातली. अंबाती रायुडुनं (२५ नाबाद) जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ३१ रनांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यामुळेच चेन्नईचा स्कोअर १३२ पर्यंत पोहोचू शकला. सनरायजर्सकडून राशीद खाननं २ विकेट घेत चेन्नईच्या बॅट्समन्सला चांगलंच झुंजवलं. तर खलील अहमद, नदीम आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

विजयासाठी अवघ्या १३३ रनांचं आव्हान असलेल्या सनरायजर्स हैदराबादची सुरुवात देखील तशीच झोकात झाली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्यांच्या ३० धावा फलकावर लागल्या होत्या. सहाव्या ओव्हरमध्येच अवघ्या २५ बॉलमध्ये वॉर्नरनं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पुढच्याच बॉलवर चहरच्या बॉलिंगवर तो आऊट झाला. सातव्या ओव्हरमध्ये कॅप्टन विल्यम्सन देखील अवघ्या ३ रनांवर स्वस्तात माघारी परतला, तेव्हा चेन्नईच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र, सलामीवीर बेयरस्टो एका बाजूनं खिंड लढवत होता. १० ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोअर होता ८५ रनांवर २ विकेट!