घरक्रीडाटी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडल्यास यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची खात्री!

टी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडल्यास यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची खात्री!

Subscribe

डेविड वॉर्नरचे उद्गार

ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरला खात्री आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, ऑस्ट्रेलियात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यास बीसीसीआय या काळात आयपीएलचे आयोजन करु शकेल. करोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने यंदा टी-२० विश्वचषक होणे जवळपास अशक्यच आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यामुळे आयपीएल होण्याची शक्यता वाढली आहे.

यंदा टी-२० विश्वचषक होऊ शकणार नसेल, तर त्याजागी आयपीएल होईल असे मला वाटते. आम्हाला (ऑस्ट्रेलियन खेळाडू) या स्पर्धेत खेळता येईल याची मला खात्री आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला परवानगी दिली, तर आम्ही नक्कीच भारतात येऊन आयपीएल स्पर्धेत खेळू. आम्ही क्रिकेटपटू आहोत आणि क्रिकेटवर आमचे प्रेम आहे. त्यामुळे जिथे संधी मिळेल, तिथे आम्हाला क्रिकेट खेळायला आवडेल, असे वॉर्नर म्हणाला.

- Advertisement -

टी-२० विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय आयसीसी पुढील महिन्यात घेण्याची शक्यता आहे. प्रत्येक जणच आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे वॉर्नर म्हणाला. प्रत्येक (१६) संघाला ऑस्ट्रेलियात आणणे हे मोठे आव्हान आहे. या संघांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. तसेच ऑस्ट्रेलियात करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता टी-२० विश्वचषकाबाबत आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत, असे वॉर्नरने नमूद केले.

कसोटी मालिकेसाठी उत्सुक!

भारत आणि ऑस्ट्रेलिया या अव्वल दोन संघांमध्ये यावर्षाअखेरीस चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मागील वर्षी भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्या मालिकेत डेविड वॉर्नर खेळू शकला नव्हता. त्यामुळे यंदा भारताविरुद्ध खेळण्यास तो उत्सुक आहे. भारताविरुद्धची मालिका प्रेक्षकांविना खेळणे विचित्र वाटेल. या मालिकेसाठी माझी ऑस्ट्रेलियन संघात निवड होईल अशी आशा आहे. मी या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहे. मागील वर्षी आम्ही मालिका गमावली, पण आमचा संघ तितकाही वाईट खेळला नव्हता. एका चांगल्या संघाने आम्हाला पराभूत केले आणि त्यांची गोलंदाजी फारच उत्कृष्ट आहे, असे वॉर्नर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -