प्रत्येक मालिकेत एकतरी डे-नाईट कसोटी व्हावी!

सौरव गांगुलीचे मत

भारतीय क्रिकेट संघाने प्रत्येक मालिकेत किमान एक डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामना खेळायला हवा, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले. अनेक वर्षे नकार दिल्यानंतर अखेर भारताने काही दिवसांपूर्वी आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर मागील महिन्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या या सामन्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. मागील काही वर्षांत एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवताना पाहायला मिळत होते. मात्र, डे-नाईट सामन्यांमुळे चाहते पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळतील असे गांगुलीला वाटत होते आणि तसेच झाले. कोलकात्यात झालेला सामना केवळ तीन दिवसांत संपला, पण या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती.

डे-नाईट कसोटी सामन्यांचा मी चाहता आहे. कसोटी क्रिकेटला पुढे नेण्यासाठी हे सामने होण्याची गरज आहे. प्रत्येक कसोटी सामना डे-नाईट व्हावा असे मी म्हणत नाही, पण भारताने प्रत्येक मालिकेत किमान एक डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामना खेळायला हवा. ईडन गार्डन्सवरील सामन्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आणि याबाबत मी खुश आहे. मी माझा अनुभव बोर्डातील इतर लोकांना सांगेन. आम्ही भारतात इतर ठिकाणीही डे-नाईट कसोटी सामने खेळवण्याचा प्रयत्न करु. कोणत्याही खेळाडूला केवळ ५००० लोकांसमोर कसोटी सामने खेळायला आवडत नाही, असे गांगुली एका मुलाखतीत म्हणाला.

डे-नाईट सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळेल, पण हे सामने कधीतरीच झाले पाहिजेत, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी व्यक्त केले होते. त्यामुळे कोहली आता गांगुलीच्या मताशी सहमत होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच भारत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला परदेशातील पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.