घरक्रीडाक्रिकेटशौकिनांचा डिनो गेला!

क्रिकेटशौकिनांचा डिनो गेला!

Subscribe

डीन जोन्स हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू, नामवंत क्रिकेट समालोचक. अलीकडेच मुंबईत त्याचे निधन झाले. डिनो या नावाने क्रिकेट वर्तुळात तो परिचित. हरहुन्नरी माणूस, भाषेवर प्रभुत्व, क्रिकेटची सखोल माहिती, उत्तम भाष्यकार, खेळाचे अचूक विश्लेषण ही त्याची खासियत. त्याच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांना धक्का बसला. डीन जोन्स म्हटले की, आठवण येते मद्रासच्या टाय कसोटीची आणि त्या कडक उन्हात चेपॉकवर वांत्या करणारा, बॅटवर काठीप्रमाणे वाकून राहणाऱ्या डिनोची. 

ऑस्ट्रेलियासाठी १९८६-८७ चा मोसम खासच ठरला. मद्रासच्या चेपॉकवरील कसोटी सामना टाय झाला, तो सप्टेंबर १९८६ मध्ये. त्यानंतर वर्षभरातच भारतात बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघाने कलकत्ताच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडला हरवून वर्ल्डकप पटकावला. या दोन्ही संघात डीन जोन्सने महत्वपूर्ण भूमिका बजावली. मद्रासच्या घामटा काढणाऱ्या उन्हात जोन्सला मैदानातच वांत्या झाल्या, पण त्याने तब्बल साडेआठ तास किल्ला लढवत २ षटकार आणि २७ चौकारांच्या मदतीने २१० धावा केल्या त्या ३३० चेंडूंत! सलामीवीर बूनच्या साथीने त्याने १५८ धावांची भर घातली, तर नंतर कर्णधार बॉर्डरसोबत चौथ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी रचली.

या भागीदारीदरम्यान जोन्सला वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परत जायचे होते, पण कर्णधार बॉर्डरने त्याला डिवचले. ‘तू तर डरपोक व्हिक्टोरियन,’ बस हे ऐकल्यावर जोन्सचे पित्त खवळले. त्याने बॉर्डरची कानउघडणी केली आणि दिमाखदार द्विशतक झळकावले. त्याची ही अवघी तिसरीच कसोटी. मात्र, ज्या धीरोदात्तपणे मद्रासच्या कडक उन्हात; कपिल देवसह मणिंदर सिंग, शिवलाल यादव, रवी शास्त्री या फिरकी त्रिकुटाला सामोरे जात जोन्सने जी खेळी केली, तिचा उल्लेख टाय कसोटीच्या स्मृती चाळवल्या की निश्चितच होतो. या खेळीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये निर्विवादपणे मानाचे स्थान आहे.

- Advertisement -

जोन्सने नंतर १९८८-८९ मध्ये अॅडलेड कसोटीत विंडीजविरुद्ध २१६ धावा फटकावल्या, त्यादेखील मार्शल, अँब्रोज, वॉल्श, पॅटरसन या तोफखान्यासमोर. जोन्सची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या. मात्र, मद्रास टाय कसोटीतील द्विशतकाची सर त्याला नाहीच. जोन्सने ११ कसोटी शतके झळकावली, ज्यात दोन द्विशतकांचा समावेश होता. पर्थ कसोटीत सचिन तेंडुलकर शतक फटकावत असताना जोन्सनेदेखील नाबाद दीडशे धावा चोपून काढल्या होत्या. १९८९-९० च्या मोसमात त्याने पाकिस्तानविरुद्ध तर अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता.

कसोटीपेक्षाही त्याचा खेळ झटपट क्रिकेटला साजेसा, अनुकूल होता. फटकेबाजी करताना चेंडू क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून टोलवण्यात तो तरबेज होता. १९८७ वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने पटकावला. या विश्वविजयात जेफ मार्श, बून, जोन्स या त्रिकुटाचा मोठा वाटा होता. जोन्सने ३१९ धावा फटकावताना ३ अर्धशतके केली. तसेच न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही साखळी सामन्यांत त्याने शतकी भागीदाऱ्या केल्या, त्या बून आणि मार्शसोबत! धावा पळण्यातील त्याचे कसब वाखाणण्याजोगचे. चोरटी धाव घेण्यात त्याचा हातखंडा होता.

- Advertisement -

जोन्स तसा लवकरच निवृत्त झाला. दशकभराच्या कालावधीत ५२ कसोटीत ३६३१ धावा, तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६४ सामन्यांत ६०६८ धावा ही कामगिरी चांगलीच म्हणावी लागेल. नंतरच्या काळात डिनोने आपला मोर्चा वळवला तो समालोचन कक्षाकडे. क्रिकेटचे धावते समालोचक म्हणून रिची बेनो, टोनी ग्रेग, इयन चॅपल, बिल लॉरी अशी मातब्बर मंडळी होती आणि त्यात भर पडली ती डीन जोन्सची.

टेन स्पोर्ट्ससाठी त्याने सुरुवातीला श्रीलंका, पाकिस्तान येथे संजय मांजरेकर, रमीझ राजा यांच्या साथीने बरेच वर्ष समालोचकाची भूमिका बजावली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका येथील १९९६ चा वर्ल्डकप, तसेच विविध तिरंगी स्पर्धा आणि नंतरच्या कालावधीत आयपीएलसाठी, पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांसाठी तो दक्षिण आशियाई देशांत येऊ लागला. पुढे त्याला प्रशिक्षणात आवड निर्माण झाली आणि कराची संघाचा तो मार्गदर्शक झाला. त्यांनी पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपदही पटकावले.

भारत त्याची आवडती भूमी! त्यातही चेन्नईशी त्याची नाळ आधीच जुळली होती. तामिळनाडू क्रिकेट लीगमध्ये समालोचन करताना त्याने मद्रास शहर आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीची त्याला चांगलीच ओळख झाली. इडली, डोसा, पायसम, विविध प्रकारचे भात यात त्याला विलक्षण दिलचस्पी! तामिळनाडू प्रमाणेच कर्नाटक क्रिकेट लीगमध्ये समालोचन तो करत असे.

प्रोफेसर डिनो हा त्याचा टीव्हीवरील कार्यक्रम भलताच लोकप्रिय होता. कॉनव्होकेशन सोहळ्यात वापरला जाणारा पेहराव करुन डिनो क्रिकेटमधील बारकावे समजवून सांगायचा. फळ्यावर सगळे व्यवस्थित लिहायचा. त्याचे हे रूपही लोभस वाटत असे. एकदा दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, पण नंतर माफी मागून त्याने हे प्रकरण मिटवले. एकदा वेस्ट इंडिजमध्ये नो-बॉलवर बाद होण्याची आपत्ती त्याच्यावर ओढवली, तेव्हा वाईट वाटले होते. आता तर त्याच्या अचानक एक्झिटने खूपच दुःख झाले आहे. त्याला विनम्र आदरांजली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -