घरक्रीडाटी-२० वर्ल्डकपबाबत निर्णय आयसीसी बोर्डाच्या बैठकीत

टी-२० वर्ल्डकपबाबत निर्णय आयसीसी बोर्डाच्या बैठकीत

Subscribe

२०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषकाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता १६ संघांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकाचे आयोजन अनेकांना अवघड वाटत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाने सप्टेंबरपर्यंत आपल्या सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयसीसी ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय गुरुवारी होणार्‍या आयसीसीच्या बोर्डाच्या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे. ही बैठक टेली-कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.

गुरुवारी आयसीसीच्या बोर्डाची बैठक होणार असून यात यंदाच्या टी-२० विश्वचषकबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकेल. सध्याची परिस्थिती पाहता, टी-२० विश्वचषक ठरल्याप्रमाणे होण्याची शक्यता कमीच आहे. हा विश्वचषक लांबणीवर पडू शकेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणतीही संघटना यावर आक्षेप घेईल असे वाटत नाही. परंतु, याबाबतची अधिकृत घोषणा कधी होणार हे सांगणे अवघड आहे, असे आयसीसीच्या बोर्डाचा सदस्य म्हणाला. यंदाचा टी-२० विश्वचषक पुढे ढकलल्यास आयसीसीच्या सदस्य संघटनांना आपल्या पुढील योजना आखता येतील.

- Advertisement -

पुढील वर्षीच भारतात टी-२० विश्वचषक होणार असल्याने ऑस्ट्रेलियातील पुढे ढकलण्यात आलेल्या विश्वचषकाचे आयोजन कधी करायचे हा प्रश्न आयसीसीसमोर आहे. २०२२ मध्ये आयसीसीची कोणतीही स्पर्धा होणार नसल्याने तेव्हा हा विश्वचषक होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे करोनामुळे दोन महिने क्रिकेट बंद असल्याने सर्वच देशांतील संघटनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या संघटना आता द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य देऊ शकतील.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार?

करोनामुळे यावर्षाच्या अखेरीस होणार्‍या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता हा दौरा ठरल्याप्रमाणे होणार असे बीसीसीआयमधील सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार हे जवळपास निश्चितच आहे आणि इंग्लंडचा संघही पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या टी-२० मालिकेबाबतचा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकाच घेईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच भारतातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास यंदा आयपीएलही होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -