IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स ‘या’ तीन खेळाडूंना संघात घेण्याची शक्यता 

दिल्लीचा संघ पहिल्यांदा आयपीएल जिंकण्यास उत्सुक आहे. 

delhi capitals team
दिल्ली कॅपिटल्स

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मागील मोसमात दमदार कामगिरी केली होती. त्यांनी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, मुंबई इंडियन्सने त्यांना पराभूत केले. अंतिम सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली होती. मुंबईने १५७ धावांचे आव्हान ५ विकेट राखून पूर्ण करत पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वीच आठही संघांनी काही खेळाडूंना संघात रिटेन केले होते आणि काही खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला होता. दिल्लीने सहा खेळाडू संघाबाहेर केले. तसेच त्यांनी हर्षल पटेल आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे ट्रेड केले. आता दिल्ली इतर संघांमधील ‘तीन’ खेळाडूंना आपल्या संघात घेण्यास उत्सुक असू शकतील.

क्रिस लिन – मागील मोसमात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने (६१८ धावा) अप्रतिम कामगिरी केली. मात्र, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे अपयशी ठरले. त्यामुळे आगामी मोसमाआधी दिल्लीचा संघ धवनसाठी नवा सलामीचा साथी शोधण्याची शक्यता आहे. दिल्ली ऑस्ट्रेलियन फलंदाज क्रिस लिनला ट्रेडच्या मार्फत आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असू शकेल. मागील मोसमात लिन मुंबई इंडियन्स संघात होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

डेविड मिलर – दिल्लीला मागील मोसमात फिनिशरची कमतरता जाणवली. मार्कस स्टोईनिसने काही महत्वपूर्ण खेळी केल्या, पण त्याला तळाच्या इतर फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेविड मिलरला आपल्या संघात घेऊ शकेल. मिलर मागील वर्षी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. मात्र, तो केवळ एक सामना खेळला. मिलरच्या समावेशाने दिल्लीची मधली फळी मजबूत होऊ शकेल.

सिद्धार्थ कौल – मागील मोसमात कागिसो रबाडा (३० विकेट) आणि एन्रिच नॉर्खिया (२२ विकेट) या दक्षिण आफ्रिकेच्या तेज जोडगोळीने अप्रतिम खेळ केला. मात्र, दिल्लीच्या भारतीय वेगवान गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे आगामी मोसमासाठी दिल्लीचा संघ भारतीय वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. ते सिद्धार्थ कौलला आपल्या संघात घेण्याचा विचार करू शकतील. सनरायजर्स हैदराबादकडून कौल मागील मोसमात केवळ एक सामना खेळला.


हेही वाचा – IPL 2021 : ‘हे’ तीन खेळाडू लिलावात राहणार अनसोल्ड?