घरIPL 2020IPL 2020 : दिल्लीचा केकेआरला दणका; उभारली यंदाची सर्वोच्च धावसंख्या 

IPL 2020 : दिल्लीचा केकेआरला दणका; उभारली यंदाची सर्वोच्च धावसंख्या 

Subscribe

कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांनी अर्धशतके केली.  

मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकांमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२८ अशी धावसंख्या उभारली. ही यंदाच्या मोसमात कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधीची सर्वोच्च धावसंख्याही शारजाच्या मैदानावरच करण्यात आली होती. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने ६ बाद २२६ अशी धावसंख्या उभारत विजय मिळवला होता. मात्र, तो विक्रम आता दिल्लीने मोडला.

५६ धावांची सलामी

आजच्या (शनिवार) सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. या दोघांनी अवघ्या ५.५ षटकांत ५६ धावांची भागीदारी रचल्यावर धवनला (२६) वरुण चक्रवर्तीने बाद केले. यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अप्रतिम फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. पृथ्वीने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केल्यावर त्याला युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीने माघारी पाठवले.

- Advertisement -

श्रेयसचे यंदा पहिलेच अर्धशतक 

श्रेयसने मात्र आपली फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने अवघ्या २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे यंदाच्या मोसमातील पहिलेच अर्धशतक ठरले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याने अधिकच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या १२ चेंडूत त्याने ३८ धावा चोपून काढल्या. त्याला १७ चेंडूत ३८ धावा फटकावत रिषभ पंतने चांगली साथ दिली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ४ बाद २२८ असा धावांचा डोंगर उभारला. श्रेयस ३८ चेंडूत ८८ धावांवर नाबाद राहिला. त्याने या धावा ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -