घरक्रीडासिंधू, प्रणितचे आव्हान संपुष्टात

सिंधू, प्रणितचे आव्हान संपुष्टात

Subscribe

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क ओपन स्पर्धेतील आव्हान दुसर्‍याच फेरीत संपुष्टात आले. तिचा दक्षिण कोरियाची सतरा वर्षीय खेळाडू एन से यंगने पराभव केला. तसेच पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि साई प्रणित यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीप्रमाणेच पुरुष दुहेरीतीलही भारताचे आव्हान संपुष्टात आले.

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत सिंधूवर यंगने २१-१४, २१-१७ अशी मात केली. ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर सिंधूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. डेन्मार्क ओपनआधी चीन ओपनच्या दुसर्‍या फेरीत, तर कोरिया ओपनच्या पहिल्या फेरीत ती पराभूत झाली होती. डेन्मार्क ओपनमधील दुसर्‍या फेरीच्या सामन्याची यंगने अप्रतिम सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या गेममध्ये सिंधू १-६ अशी पिछाडीवर होती. सिंधूने चांगले पुनरागमन करत यंगची आघाडी ७-८ अशी कमी केली.

- Advertisement -

मात्र, यानंतर सलग ६ गुण मिळवत यंगने १४-७ अशी आघाडी घेतली. पुढेही तिने चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला. दुसर्‍या सामन्याची सिंधूने उत्तम सुरुवात करत ८-४ अशी आघाडी मिळवली. मात्र, मध्यंतरापर्यंत यंगने तिची आघाडी ११-९ अशी कमी केली. मध्यंतरानंतर सिंधूकडे १६-१४ अशी होती. मात्र, यानंतर ७ पैकी ६ गुण मिळवत यंगने दुसरा गेम २१-१७ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

पुरुष एकेरीत समीर वर्माचा चीनच्या चेन लॉन्गने १२-२१, १०-२१ असा, तर साई प्रणितचा अव्वल सीडेड जपानच्या केंटो मोमोटाने ६-२१, १४-२१ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीवर चीनच्या हान चेंग काय-झोऊ हाओ डाँगने १६-२१, १५-२१ अशी सरळ गेममध्ये मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -