घरक्रीडामयांक, शुभमन गिलचे शतक; भारत क संघाचा विजय

मयांक, शुभमन गिलचे शतक; भारत क संघाचा विजय

Subscribe

 देवधर करंडक स्पर्धा

मयांक अगरवाल आणि कर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केलेल्या शतकांच्या जोरावर भारत क संघाने देवधर करंडकाच्या सामन्यात भारत अ संघावर २३२ धावांनी मात केली. हा भारत अ संघाचा सलग दुसरा पराभव होता. भारत क संघाने या विजयामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक शतक आणि एक द्विशतक झळकावणार्‍या मयांकने या सामन्यात १११ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२० धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने १४२ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह १४३ धावा केल्या.

या सामन्यात भारत क संघाचा कर्णधार गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयांक आणि गिल यांनी त्यांच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. खासकरून मयांकने आक्रमक फलंदाजी करत ९६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील १३वे शतक होते. मात्र, १२० धावांवर त्याला हनुमा विहारीने भार्गव मेराईकरवी झेलबाद केले. त्याने आणि गिलने २२६ धावांची भागीदारी केली. गिलने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत १२३ चेंडूत आपले शतक झळकावले. प्रियम गर्गला अवघ्या १६ धावाच करता आल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव आणि गिलने धावांची गती वाढवली. गिलला अखेर १४३ धावांवर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने माघारी पाठवले. अखेरच्या षटकांमध्ये सूर्यकुमारने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या २९ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्यामुळे भारत क संघाने ५० षटकांत ३ विकेट गमावत ३६६ धावांचा डोंगर उभारला.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना भारत अ संघाने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. सलामीवीर विष्णू विनोद (१२), अभिषेक रामन (२) आणि कर्णधार विहारी (०) झटपट माघारी परतल्याने भारत अची चौथ्या षटकात ३ बाद १७ अशी अवस्था झाली होती. देवदत्त पडिक्कल (३१) आणि मेराई (३०) यांनी ५७ धावांची भागीदारी करत भारत अ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑफस्पिनर जलज सक्सेनाने या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जलजनेच पुढील पाच विकेट्स मिळवल्या. त्यामुळे भारत अ संघाचा डाव ३०व्या षटकात १३४ धावांवर आटोपला. जलजने ९.५ षटकांत ४१ धावांच्या मोबदल्यात ७ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

भारत क : ५० षटकांत ३ बाद ३६६ (शुभमन गिल १४३, मयांक अगरवाल १२०, सूर्यकुमार यादव नाबाद ७२; हनुमा विहारी १/४८) विजयी वि. भारत अ : २९.५ षटकांत सर्वबाद १३४ (देवदत्त पडिक्कल ३१, भार्गव मेराई ३०; जलज सक्सेना ७/४१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -