पैलवानांच्या मानधनात तिपटीने वाढ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

युवकांनी कुस्तीत भाग घ्यावा. त्यांनी मेहनत घ्यावी यासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. कारण मेहनत करायची असल्यास तसा खुराकही लागतो. त्याची व्यवस्था करण्यासाठीच पैलवानांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली आहे. यापुढेही तशी संधी देण्याचे काम निश्चितपणे करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

devendra fadnavis

पुणेः आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या पैलवांनाच्या मानधनात तिप्पटीने वाढ करण्यात आली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात केली.

६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी पैलवानांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या पैलवानांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

युवकांनी कुस्तीत भाग घ्यावा. त्यांनी मेहनत घ्यावी यासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. कारण मेहनत करायची असल्यास तसा खुराकही लागतो. त्याची व्यवस्था करण्यासाठीच पैलवानांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी देण्यात आली आहे. यापुढेही तशी संधी देण्याचे काम निश्चितपणे करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

उत्कृष्ट पैलवान घडविण्यासाठी मिशन ऑलिम्पिक सुरु करण्यात येणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारा एक तरी पैलवान या मोहिमेतून तयार केला जाईल. महिला कुस्ती स्पर्धेसाठी पुढाकार घेतल्यास शासन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला मदत करेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर पदक मिळविणाऱ्या पैलवानांना तयार करण्यात महाराष्ट्र मागे राहिला, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी क्रीडामंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. आयुष्यभर कष्ट करून देशाचे नाव लौकीक करणाऱ्या पैलवानांना तुलनेत कमी मानधन मिळते. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते.