धवन आऊट, सॅमसन इन!

दुखापतीमुळे शिखर विंडीज मालिकेला मुकणार

भारताचा सलामीवीर शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो तीन सामन्यांच्या या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केरळचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सॅमसनची भारतीय संघात निवड झाली होती, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, असे असतानाही त्याला संघातून वगळण्यात आल्याने बरेच प्रश्न उपस्थित केले जात होती. आता धवनच्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे खुली झाली आहेत.

सध्या सुरत येथे सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमधील महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळणार्‍या धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. याबाबतची माहिती देताना बीसीसीआयने सांगितले, बीसीसीआयच्या डॉक्टरांनी मंगळवारी धवनची तपासणी केली. त्याच्या गुडघ्याला टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धवनला पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय सिनियर निवड समितीने टी-२० मालिकेसाठी धवनच्या जागी संजू सॅमसनची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

सॅमसन २०१५ मध्ये आपला एकमेव टी-२० सामना खेळला होता. यंदाच्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याचे बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली, पण सॅमसनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याला विंडीजविरुद्धच्या मालिकेत मधल्या फळीत खेळायला मिळू शकेल.

विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला हैदराबाद येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना तिरुअनंतपुरम (८ डिसेंबर), तर तिसरा सामना मुंबईत (११ डिसेंबर) होणार आहे. धवन टी-२० मालिकेला मुकणार असला तरी एकदिवसीय मालिकेआधी फिट होण्याची शक्यता आहे.

विंडीज टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.

नैसर्गिक खेळच करणार – सॅमसन

संजू सॅमसन भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो, पण त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. मात्र, मी याबाबत फारसा विचार करत नाही आणि संघासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे, असे सॅमसन म्हणाला. माझ्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे असे म्हटले जाते, पण मी याचा फार विचार करत नाही. मी थोड्या वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे. मी डावाच्या सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. आता मी जर सातत्याचा विचार करू लागलो, तर मी नैसर्गिक खेळ करू शकणार नाही, असे सॅमसनने स्पष्ट केले.