घरक्रीडाधोनी जरुरी है...

धोनी जरुरी है…

Subscribe

एकीकडे भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचा तिढा चर्चेत असताना आता ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंग धोनीच्या संथ फलंदाजीवर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ फलंदाजीतील संथपणामुळे त्याच्या निवृत्तीची किंवा त्याला पर्याय शोधण्याची चर्चा करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न निश्चितच पडतो. विश्वचषकात आतापर्यंतच्या सामन्यांत धोनीने यष्टीमागे सात झेल आणि तीन फलंदाजांना यष्टिचित केले आहे. फलंदाजीतही त्याने ९ सामन्यांत (एका सामन्यात फलंदाजी नाही, एक सामना झाला नाही) २२३ धावा केल्या आहेत. त्याच्यादृष्टीने ही कामगिरी फार मोठी नसली तरी संघाच्या विजयात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना जखमी झाल्यानंतरही पुढील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तितक्याच धडाडीने यष्टीमागे उभ्या राहणार्‍या धोनीने केलेले दमदार यष्टीरक्षण लक्षात राहणारे आहे. त्याने करुणारत्ने, कुसाल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांचे झेल घेतलेच, शिवाय कुसाल मेंडिसला यष्टिचित करून तंबूचा रस्ता दाखवला. वास्तविक पाहता पहिल्यांदाच चार यष्टिरक्षक घेऊन खेळणार्‍या भारतीय संघाने त्याला पर्याय म्हणून अन्य यष्टिरक्षकाला उभे केले नाही, यातच सर्व काही अधोरेखित होते. धोनी यष्टीमागे उभा असल्यानेच गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास वाढतो.

- Advertisement -

केवळ यष्टिरक्षण नव्हे, तर प्रत्येक खेळाडूसह फलंदाजांच्या बारीक हालचालींवरही धोनीची करडी नजर असते. गोलंदाजाची चेंडू पकडण्याची आणि टाकण्याची पद्धत फलंदाजांपेक्षा धोनी अधिक चांगल्या प्रकारे ओळखतो, हे विशेष. यामुळेच क्षेत्ररक्षणात त्याच्याइतके प्रभावी बदल कुणीही करत नसावे. डीआरएस घेण्याच्या वेळीही धोनीला दिले जाणारे महत्त्व अनेकदा फायद्याचे ठरले आहे. सलग तिसर्यांदा विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज धोनी प्रत्येक सामन्यागणिक कर्णधार कोहलीला अनुभवातून मार्गदर्शन करताना दिसून येतो. आता उपांत्य फेरीच्या सामन्यासह अंतिम सामन्यातही त्याच्या फलंदाजी, यष्टीरक्षण आणि अनुभवाचा फायदा भारतीय संघाला महत्त्वाचा ठरेल, यात शंका नाही.

चार यष्टिरक्षक!
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने तब्बल चार यष्टिरक्षक खेळवले आहेत. अनुभवी महेंद्रसिंग धोनीबरोबरच सलामीवीर लोकेश राहुल, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत हे चौघेही यष्टीरक्षक आहेत. बांगलादेशसह न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही ही चौकडी दिसून आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. मुख्य म्हणजे या तिघांतही धोनीची जागा घेण्याची अद्याप क्षमता नसल्याने तसेच धोनीच्या अनुभवाचा फायदा संघाला होत असल्याने ‘धोनी जरुरी है’, असे म्हणणेच योग्य ठरेल.

- Advertisement -

संथ फलंदाजी?
धोनीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केदारच्या साथीने फलंदाजी करताना संथगतीने धावा केल्याची ओरड होती. पूर्वी मोठे फटके मारून जलद धावा काढणारा धोनी आता क्वचितच तसे करताना दिसत असला, तरी जबाबदार आणि परिस्थिती समजून खेळणारा धोनी तितक्याच प्रभावीपणे खेळताना दिसतो. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली, तर इंग्लंडविरुद्ध नाबाद ४२ धावांची खेळी केली होती. त्याचा शांत स्वभाव आणि फिटनेसला आजही तोड नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -