घरक्रीडाधोनीचा सल्ला आला कामी!

धोनीचा सल्ला आला कामी!

Subscribe

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १६ धावांची गरज असताना मोहम्मद नबीने चौकार लगावत शमीवर दबाव टाकला. मात्र, शमीने पुनरागमन करत नबीला बाद केले. यानंतरही सलग दोन विकेट्स घेत शमीने आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि भारताला विजय मिळवून दिला. विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा शमी हा चेतन शर्मा यांच्यानंतर केवळ दुसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याला ही कामगिरी करण्यासाठी अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा सल्ला फायदेशीर ठरला. अखेरच्या षटकात मला माही भाईने यॉर्कर टाकण्यास सांगितले, असे सामन्यानंतर शमीने सांगितले.

अखेरच्या षटकात मी स्पष्ट योजनेने गोलंदाजी करत होतो. मला यॉर्कर टाकायचे होते. मी दोन विकेट्स मिळवल्यानंतर माही भाईनेही (धोनी) मला यॉर्कर टाकत राहण्याचा सल्ला दिला. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला की, ‘तू योग्य पद्धतीने गोलंदाजी करत आहेस. तुला काहीही बदल करण्याची गरज नाही. तुला हॅट्ट्रिक मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळत नाही. त्यामुळे जशी गोलंदाजी करत आहेस, तशीच करत राहा.’ त्याच्या सल्ल्यानुसारच मी गोलंदाजी केली आणि मला हॅट्ट्रिक मिळाली, असे शमी म्हणाला. शमीने या सामन्यात ४० धावांत ४ विकेट्स मिळवल्या.

- Advertisement -

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या पायाला दुखापत झाल्यामुळे शमीला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने याचा चांगला उपयोग केला. याबाबत तो म्हणाला, मला नशिबाने या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मी या सामन्यासाठी तयार होतो. हॅट्ट्रिकबाबत म्हणायचे झाले तर विश्वचषकात तरी तुम्हाला हॅट्ट्रिक घेण्याची वारंवार संधी मिळत नाही. त्यामुळे ही कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.

मागील वर्षी यो-यो टेस्ट पास न झाल्यामुळे शमीला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याने फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. तो सध्या भारताच्या सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या फिटनेसबाबत शमीने सांगितले, काही काळापूर्वी मला दुखापत झाली होती आणि त्यानंतर माझे वजन वाढले होते. काही षटके टाकल्यावर मला थकवा जाणवायचा. त्यानंतर माझी शस्त्रक्रियाही झाली. त्यावेळी मला कळले होते की, मला क्रिकेटमधील प्रवास सुरू ठेवण्यासाठी फिटनेसवर मेहनत घेण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -