धोनीची शेवटची आयपीएल? सुरेश रैनाचं सूचक वक्तव्य

Dhoni and suresh raina
धोनी आणि सुरेश रैना - चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएलचा किताब दोन वेळा पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने यावेळी देखील फायनलमध्ये धडक मारली आहे. संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो एम. एस. धोनीचा! आयपीएल मधील ‘सर्वात यशस्वी कर्णधार’ ही धोनीची ओळख आहे. महेंद्रसिंग धोनी २००४मध्ये भारतीय संघात आला. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या माहीने अगदी कमी अवधीतच भारतीय रसिकांची मनं जिंकली. धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघाने फायनलमध्ये खेळण्याची ही सातवी वेळ आहे.

आयपीएलमधील कॅप्टन म्हणून शेवटची खेळी?

धोनी भारतीय संघाच्या कप्तानपदावरून आधीच पायउतार झाला आहे. पण आता आयपीएलमध्ये ही त्याची कप्तान म्हणून शेवटची खेळी असणार का? अशीच चर्चा सध्या रंगली आहे. कारण “यावेळी आयपीएलची ट्रॉफी ही आम्हाला केवळ आमचा कप्तान धोनीसाठी जिंकायची आहे” असं धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैना यानं सांगितलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे धोनीची कप्तान म्हणून ही आयपीएलची ही शेवटची खेळी तर नाही ना? असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

धोनीसाठी जिंकायची आहे ट्रॉफी – सुरेश रैना

“यावेळी जेव्हा चेन्नईचा संघ फायनलला पोहोचला, तेव्हा धोनी खूपच भावनिक झाला आणि त्याला चेन्नई संघाची खूपच काळजी आहे. अर्थात ती आम्हालादेखील आहे. पण तो गेले सात हंगाम अर्थात २००८ सालापासून या संघाचं नेतृत्त्व करत आहे. त्यामुळे यावेळी त्याच्यासाठी जिंकायचं आहे.” असं रैनाने सीएसके वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
पुढे रैना असंही म्हणाला की, “प्रत्येक वेळी धोनीला बऱ्याच लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं, पण प्रत्येकाला त्याने केवळ आपल्या परफॉर्मन्सने गप्प केलं आहे. तुम्ही त्याची भानविक बाजूदेखील बघणं गरजेचं आहे. धोनीने प्रत्येक वेळी आपली कॅप्टन्सी आणि खेळाने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही फायनल जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”

चेन्नई सुपर किंग्ज की सनरायझर्स हैदराबाद? ट्रॉफी कोणाची?

फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादबरोबर चेन्नईचा संघ परत आपली जादू दाखवणार की, सनरायझर्स क्वालिफायरमध्ये हरल्याचा वचपा काढणार, हे रविवारी अर्थात २७ मे ला रात्री कळेलच!