घरक्रीडाविश्वचषकासाठी धोनीचे महत्त्व अतुलनीय!

विश्वचषकासाठी धोनीचे महत्त्व अतुलनीय!

Subscribe

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते आगामी विश्वचषकात भारताला चांगली कामगिरी करायची असल्यास महेंद्रसिंग धोनीचे योगदान खूप महत्त्वाचे असेल. धोनीवर मागील काही काळापासून त्याच्या संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली होती. मात्र, त्याने यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील ३ सामन्यांत ३ अर्धशतके करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही धोनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेच्या ११ सामन्यांच्या ८ डावांत ११९.३३ च्या सरासरीने ३५८ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता विश्वचषकातही भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभारायची असल्यास धोनीचे योगदान महत्त्वाचे असेल असे गावस्करांना वाटते.

भारताचे अव्वल तीन फलंदाज (रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली) हे फारच अफलातून आहेत. मात्र, विश्वचषकात त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तर चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार्‍या धोनीचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. तो जर चांगला खेळला तरच प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली धावसंख्या रचता येईल, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

तसेच धोनीच्या यष्टीरक्षणाबद्दल गावस्करांनी सांगितले, आपल्या सर्वांनाच माहित आहे की, धोनी किती अप्रतिम यष्टीरक्षक आहे. मात्र, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे तो यष्टीरक्षक असल्याने फिरकीपटू गोलंदाजी करताना तो यष्टींच्या जवळ उभा असतो आणि तो फिरकीपटूंना मार्गदर्शन करत असतो. तसेच तो क्षेत्ररक्षण लावायलाही मदत करतो. कर्णधार (विराट) कोहली हा खूप चांगला क्षेत्ररक्षक असल्याने तो मधल्या व अखेरच्या षटकांत सीमारेषेवर उभा असतो आणि तिथून क्षेत्ररक्षण लावणे अवघड असते. अशावेळी त्याला धोनीचा फायदा होता.

धोनीच्या नेतृत्त्वात भारताने २०११ विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे धोनी हा विश्वचषक जिंकलेला कर्णधार असल्याने त्याचा अनुभव अधिकच महत्त्वाचा आहे, असे गावस्करांना वाटते. जेव्हा तुमच्या संघात एखादा असा खेळाडू असतो, ज्याला विश्वचषक जिंकण्यासाठी काय करावे लागते हे माहित असते, तेव्हा त्या खेळाडूचा अनुभव संघासाठी खूपच महत्त्वाचा असतो. त्याचे तुम्ही मोजमाप करूच शकत नाही. त्यामुळे या विश्वचषकात धोनीचे योगदान खूप महत्त्वाचे असणार आहे यात शंका नाही, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

तो मैदानात येताच इतर संघांवर दबाव येतो- रैना

महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि तो फलंदाजीसाठी मैदानात येताच इतर संघांवर दबाव येतो, असे धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघातील सहकारी सुरेश रैना म्हणाला. कर्णधार धोनी संघात नसेल, तर त्याचा संघाला फार परिणाम होत नाही. मात्र, फलंदाज धोनी संघात नसेल, तर त्याचा संघावर बराच परिणाम होतो. तो जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येतो, तेव्हा आपोआपच इतर संघांवर दबाव येतो. त्याने फलंदाज म्हणून मागील काही मोसमांत चांगली कामगिरी केली आहे, असे रैनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -