घरIPL 2020अजब न्याय जोशींचा!

अजब न्याय जोशींचा!

Subscribe

विराट कोहलीचा भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून नुकतीच भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही संघांची घोषणा झाली. सुनील जोशी यांची पहिलीच संघनिवड चर्चेत आली आहे. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले. मात्र, फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला ३२ जणांच्या चमूतही जागा मिळाली नाही. त्यामुळे निवड समितीवर टीका होतेय.

ऑस्ट्रेलियाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी सुनील जोशी यांच्या राष्ट्रीय निवड समितीने ३२ जणांच्या जंबो पथकाची निवड केली आहे. मात्र, या निवडीवरून वादंग निर्माण झाले अन् दोन मुंबईकरांना डावलण्यात आल्यामुळे तर चर्चा जोरात सुरू आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला टी-२०, एकदिवसीय तसेच कसोटी संघात स्थान मिळालेले नाही, पण कर्नाटकच्या सुनील जोशी यांनी कानडी लोकेश राहुलला उपकर्णधारपदी बढती दिली.

सध्या राहुलची बॅट तळपतेय आणि त्यातून धावांचा ओघ सुरू आहे. शिवाय आयपीएलमध्ये त्याच्या पंजाब संघाने विजयाचा धुमधडाका लावलाय. सूर्यकुमार यादवला सातत्यपूर्ण खेळ करूनही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. रणजी, मुश्ताक अली, विजय हजारे स्पर्धांसह आयपीएलमध्ये सातत्याने धावा करूनही सूर्यासाठी भारतीय संघाचे दार काही उघडत नाही. ‘त्याने आणखी काय करायला हवे?’ असा सवाल माजी कसोटीपटूंसह सर्व जण विचारत आहेत.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वात महत्व असेल ते कसोटी मालिकेला. स्मिथ, वॉर्नरविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवून भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची किमया केली ती प्रामुख्याने जलद त्रिदेवांमुळे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी असे तेज त्रिकुट भारताकडे आहे. ईशांत शर्मा जायबंदी असल्यामुळे त्याची निवड झाली नाही, पण नवोदित सैनी चांगली कामगिरी करू शकेल. उंचपुऱ्या, वेगवान सैनीकडून खूप अपेक्षा आहेत. उमेश यादव चमूत असला तरी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मायदेशात त्याची कामगिरी बहरते, पण त्याला परदेशात फारसे यश मिळत नाही.

चेतेश्वर पुजाराने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावांची लयलूट करताना खेळपट्टीवर ठाण मांडण्याची भूमिका चोख बजावली होती. यंदा त्याला कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचीही साथ लाभेल अशी आशा बाळगूया. राहुल आयपीएलमध्ये धावा कुटतोय, पण याच राहुलची कसोटी क्रिकेटमधील अलीकडची कामगिरी उत्साहवर्धक नाही. त्याची सरासरी बोलकी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७.१, इंग्लंडविरुद्ध २९, विंडीजविरुद्ध मायदेशी १८, ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०.७ आणि विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये २५.४! अशा सरासरीने त्याने गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये धावा केल्या आहेत. केवळ आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला झुकते माप मिळाले आहे. कर्नाटकी मयांक अगरवालसह तो सलामीला येईल.

- Advertisement -

मुंबईकर पृथ्वी शॉची कसोटी संघात वर्णी लागली. तसेच अजिंक्य रहाणेने उपकर्णधारपद राखलेय हे सुखद आश्चर्यच! सुनील जोशींनी त्याला मान्यता दिली. सुनील जोशी यांनी जम्मू-काश्मीरचे प्रशिक्षक असताना मुंबईला मुंबईतच वानखेडेवर चारी मुंड्या चीत केले होते (२०१४-१५ मोसमात). मात्र, त्यानंतर या संघाची कामगिरी काही विशेष झाली नाही आणि जोशी यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी झाली. आता सुनील जोशी यांची पहिलीच संघनिवड चर्चेत आली असून त्यावर सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

फॉर्मात असलेल्या सूर्याला ३२ जणांच्या चमूतही जागा न मिळाल्यामुळे टीका होतेय. तसेच रोहित शर्माच्या दुखापतीबाबत काहीच स्पष्ट न सांगणाऱ्या बीसीसीआयच्या मौनी बाबा भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. साहा की पंत, या वादाला तूर्तास पूर्णविराम मिळाला. जोशी यांच्या निवड समितीने बंगालचा अनुभवी यष्टीरक्षक साहालाच अव्वल यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली असून पंत हा कसोटी संघात राखीव यष्टीरक्षक असेल. साहाच्या यष्टीरक्षणात सफाई आढळते. पंत यष्टीरक्षक आहे, पण कामचलाउच म्हणायला हवा. फलंदाजीत तो बरा आहे इतकेच. सुमार यष्टीरक्षणामुळे, तसेच स्पर्धा वाढल्यामुळे पंतला टी-२०, तसेच एकदिवसीय संघातून डच्चू मिळाला.

यंदा आयपीएलमधील कामगिरी बघून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आणि याचा सर्वाधिक लाभ झालाय तो फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला. एका सामन्यात निम्मा प्रतिस्पर्धी संघ गारद करणाऱ्या वरुणला जोशी यांच्या निवड समितीने टी-२० मध्ये पसंती दिली. पुढील वर्षी टी-२० वर्ल्डकप भारतात होणार असून त्या दृष्टीने संघ बांधणी करण्याचा निवड समितीचा प्रयत्न आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योन्मुख, होतकरू खेळाडूंना संधी दिली जाईल अन् सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या खेळाडूंना संघातील स्थान मजबूत करता येईल. त्यादृष्टीने ऑस्ट्रेलिया दौरा महत्वाचा आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. त्यात आणखी नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा असून सूर्यकुमार यादवचा त्यात समावेश असेल ही आशा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -