घरक्रीडासाऊथ कॅनरा, जय भारत क्रीडा मंडळाची विजयी घोडदौड

साऊथ कॅनरा, जय भारत क्रीडा मंडळाची विजयी घोडदौड

Subscribe

मुंबई शहर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स यांसारख्या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील ज्युनियर गटाच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसर्‍या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला. साहिल राणे, दिशांत डांगे यांच्या आक्रमक चढाया आणि त्यांना रोहित कदमच्या पकडीची मिळालेली उत्तम साथ यामुळे बालवीरने पहिल्या डावात १७-९ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र, दुसर्‍या डावात त्यांना ही आघाडी राखण्यात अपयश आले. निखिल आणि रोहन पाटील यांनी आक्रमक खेळ करत जय भारत हा सामना २८-२६ असा अवघ्या २ गुणांच्या फरकाने जिंकवून दिला. जय भारताच्या शुभम मटकरने पकडीत चांगला खेळ केला.

- Advertisement -

साऊथ कॅनरा स्पोर्ट्सने सिद्धीप्रभाला २९-२७ असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला साऊथ कॅनराकडे १४-५ अशी मोठी आघाडी होती. गणेश सिंग, अमन शेख यांनी चढाईत आणि नितीन मंडलने पकडीत केलेल्या दमदार खेळामुळे साऊथ कॅनराने हा सामना जिंकला. श्री गणेश स्पोर्ट्स क्लबने रंगतदार सामन्यात सुनील स्पोर्ट्स क्लबला २९-२७ असे नमवत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. या सामन्यात विश्रांतीला श्री गणेशकडे १२-११ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. अमेय बिरमोळे, अजित कडपात श्री गणेशकडून, तर आयुष सणस, सुहास डोंगरे सुनीलकडून उत्तम खेळले.

लालबाग स्पोर्ट्स क्लबने जय ब्राह्मणदेव क्रीडा मंडळावर ३१-२४ अशी मात केली. विशाल पाठक, किरण जाधव या विजयाचे शिल्पकार ठरले. राज येरंडे, विश्वजित जाधव, सुजल शिंदे यांच्या चांगल्या खेळाच्या जय खापरेश्वर क्रीडा मंडळाने अमर संदेशला ४०-२८ असे पराभूत केले. नवोदित संघाने सक्षम क्रीडा मंडळाचा ४४-३० असा पराभव करत या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्यांच्या या विजयात अजेय शिंदे, प्रणय राणे, मृगेद लाड चमकले.

- Advertisement -

इतर निकाल : १) सम्राट क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध अष्टविनायक क्रीडा मंडळ (५०-२९); २) न्यू बर्डस स्पोर्ट्स विजयी वि. अमर क्रीडा मंडळ (४७-२६); ३) विहंग क्रीडा मंडळ विजयी वि. शिवमुद्रा प्रतिष्ठान (५१-२५); ४) खडा हनुमान सेवा मंडळ विजयी वि. सूर्यकांत व्यायाम मंडळ (३८-२२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -