घरक्रीडाफेडररचे दोन विक्रम मोडण्याचे जोकोविचचे लक्ष्य!

फेडररचे दोन विक्रम मोडण्याचे जोकोविचचे लक्ष्य!

Subscribe

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच रविवारी तब्बल आठव्यांदा वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले. पाच सेट रंगलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमचा ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.

या विजयासह त्याने आपले १७ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. त्यामुळे स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या सर्वाधिक (२०) ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमापासून तो आता केवळ ३ जेतेपदे दूर आहे. तसेच फेडरर ३१० आठवडे पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यामुळे पुन्हा अव्वल स्थानी झेप घेणारा जोकोविच कारकिर्दीत २७६ आठवडे या स्थानावर राहिला आहे. आता त्याचे फेडररचे दोन्ही विक्रम मोडण्याचे लक्ष्य आहे.

- Advertisement -

मला सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करायला नक्कीच आवडेल. कारकिर्दीच्या सुरुवातीला मी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पाहायचो. मात्र, सलग दोन-तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतरच मी रॉजरचा विक्रम मोडू शकतो असे मला वाटू लागले. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाविषयी मी पूर्वी फारसा विचार करत नव्हतो. परंतु, काही वर्षे अव्वल स्थानावर राहिल्यानंतर मी क्रमवारीकडे लक्ष देऊ लागलो. आता फेडररचे हे दोन्ही विक्रम मोडण्याचे लक्ष्य आहे आणि यात लपवण्यासारखे काही नाही, असे जोकोविच म्हणाला.

या गोष्टीमुळे मानसिकदृष्ट्या कणखर झालो – जोकोविच
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचला डॉमिनिक थीम झुंज दिली. थीमने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, जोकोविचने दमदार पुनरागमन करत हा सामना पाच सेटमध्ये जिंकला. तू दबावाच्या परिस्थितीतही संयम कसा राखतोस असे विचारले असता जोकोविचने सांगितले, ९० च्या दशकात सर्बियामध्ये बरीच युद्ध झाली. त्यामुळे आम्हाला अन्न, पाणी आणि इतर मूलभूत गोष्टी सहजपणे उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, या गोष्टीमुळेच तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर होता. लहानपणी माझ्याकडे अगदी काहीच नव्हते, पण मी आणि माझ्या कुटुंबाने त्यातूनही मार्ग काढला. या गोष्टीमुळेच मला मेहनत करण्याची प्रेरणा मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -