US OPEN 2021 : जोकोव्हिचचा नवा पराक्रम, ५२ वर्षांचा विक्रम काढणार मोडीत

कॅलेंडर ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर

सर्बियन स्टार नोवाक जोकोव्हिचने शुक्रवारी रात्री पुनरागमन करत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभूत करत जबरदस्त विजयासह यूएस ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, आता जोकोव्हिच कॅलेंडर ग्रँडस्लॅमपासून फक्त एक विजय दूर आहे. अव्वल क्रमांकाचा खेळाडू जोकोव्हिचने प्रतिस्पर्धी झ्वेरेवचा न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मीडोज येथे पाच सेटच्या सामन्यात ४-६, ६-२, ६-४, ४-६, ६-२ असा पराभव केला आणि ऑलिम्पिक २०२० च्या पराभवाचा बदला देखिल घेतला.

एका वर्षात चार ग्रॅंडस्लॅम आपल्या नावे करणार जोकोव्हिच? या आधी ऑस्ट्रेलियन टेनिस पटू रॉड लीव्हर यांनी १९६९ साली म्हणजेच ५२ वर्षांपूर्वी हंगामातील सर्व चार ग्रँडस्लॅम जिंकले होते, तर सन १९८८ मध्ये अशीच कामगिरी करणारी जर्मनीची स्टेफी ग्राफ ही एकमेव महिला खेळाडू ठरली होती. आता या शर्यतीत जोकोव्हिचेही स्थान पक्के होण्याची शक्यता दिसत आहे. नोवाक जोकोव्हिच सध्या एटीपी (Association of Tennis Professionals) क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर आता युएस ओपन च्या अंतिम फेरीत लढणारा प्रतिस्पर्धी डॅनिल मेदवेदेव हा दुसऱ्या स्थानावर आहे.

जोकोव्हिचने फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, जूनमध्ये फ्रेंच ओपन आणि जुलैला विम्बल्डनमध्ये प्रमुख विजेतेपद मिळवले आहेत. ३४ वर्षीय सर्बियन जोकोव्हिचने शुक्रवारी झ्वेरेवचा पराभव करत फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करत कारकीर्दीतल्या ३१ व्या ग्रॅंड स्लॅम फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये नऊ विक्रमी अंतिम फेऱ्या गाठल्या आहेत, तर तीन वेळा चॅम्पियनशिप जिंकली आहे. एटीपीच्या क्रमवारीत सर्वाधिक आठवडे अव्वल स्थानावर असलेल्या जोकोव्हिचची रविवारी अंतिम लढत एटीपीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी होईल.

उपांत्य फेरीत मेदवेदेवने कॅनडाच्या फेलिक्सचा पराभव केला. रशियाच्या २५ वर्षीय मेदवेदेवने उपांत्य फेरीत १२ व्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर एलियासिमेचा ६-४, ७-५, ६-३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जोकोव्हिचकडून तो पराभूत झाला होता, तर २०१९ च्या यूएस ओपन फायनलमध्ये नदालने त्याला पराभूत केले होते.

नोवाक जोकोव्हिच VS डॅनिल मेदवेदेव :

जोकोव्हिचने २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली, तर रशियाच्या मेदवेदेवने २०१६ पासुन खेळायला सुरुवात केली. नोवाक जोकोव्हिच आणि डॅनिल मेदवेदेव आतापर्यंत आठ वेळा आमने सामने आले आहेत. त्यात जोकोव्हिच पाच सामने विजयी, तर डॅनिल मेदवेदेव तीन सामने विजयी झाला आहे. यात जोकोव्हिचचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे, आता दोघेही कॅलेंडर ग्रॅंडस्लॅम विजयापासून एक पाऊल दूर आहेत. दोन्ही टेबल टॉपर्सची अंतिम लढत चुरशीची पहायला मिळणार आहे.


हेही वाचा : ENG VS IND TEST MATCH : ब्रिटिश मीडियाचा “BCCI” वर संताप, IPL साठी सामना रद्द?