Badminton : देशांतर्गत बॅडमिंटन हंगाम दोन दशकानंतर होणार सुरूवात

देशात तब्बल २० वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा देशांतर्गत बॅडमिंटन हंगामाची सुरूवात होणार आहे

देशात तब्बल २० वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा देशांतर्गत बॅडमिंटन हंगामाची सुरूवात होणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघातर्फे याबाबत घोषणा केली की देशांतर्गत बॅडमिंटन हंगाम पुढील महिन्यात सुरू होईल. हंगामाची सुरूवात चेन्नईमध्ये होईल आणि पहिली स्पर्धा १६ ते २२ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल. स्तर तीनची अजून एक स्पर्धा हैदराबादमध्ये २४ ते ३० डिसेंबर पर्यंत होणार आहे. दोन्ही स्पर्धांची एकूण बक्षीसांची रक्कम प्रत्येकी १०-१० लाख रुपये आहे आणि हे भारतीय बॅडमिंडन संघाच्या नवीन देशांतर्गत स्वरूपाचा भाग आहे. ज्याला २०१९ मध्ये मान्यता देण्यात आली होती परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

चेन्नईत होणाऱ्या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर आहे तर हैदराबादमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या नोंदणीची शेवटची तारीख १ डिंसेबर आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले की, “हंगामाची सुरूवात कोरोनाच्या नियमांचे पालन करून होईल आणि स्पर्धेच्या अगोदर खेळाडूंना त्यांची कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल”.

सिंघानिया यांनी आणखी सांगितले की, कोरोनाने खेळच नाही तर जीवनातील सामान्य घटकांना देखील हानी पोहचवली आहे. आम्ही पुन्हा एकदा देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धा सुरू करण्याबाबत आनंदित आहोत. आमच्याकडे काही जागतिक पातळीवरील खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडू पुन्हा कोर्टवर दिसणे ही संपूर्ण बॅडमिंटन जगतासाठी चांगली बातमी आहे.

उच्च स्तरीय स्पर्धांचे तीन स्तरांमध्ये वर्गीकरण

स्तर ३ BAI मालिका बॅडमिंटन स्पर्धा ( एका वर्षात सहा)
स्तर २ BAI उत्कृष्ट बॅडमिंटन स्पर्धा (एका वर्षात सहा)
स्तर १ BAI प्रमुख बॅडमिंडन स्पर्धा (एका वर्षात दोन)

देशांतर्गत उच्चस्तरीय क्रमवारीच्या स्पर्धेत एकूण २ कोटी २० लाख रूपयांचे बक्षीस ठेवले आहे. स्तर तीन साठी १० लाख, स्तर दोन साठी १५ लाख आणि प्रमुख स्पर्धेसाठी २५ लाख रूपये असणार आहे. याच्यानंतर होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी ५० लाख रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.


हे ही वाचा: National wrestling championship : आई झाल्यानंतर गीता फोगटचे कमबॅक; महिला पैलवानांसोबत ट्रेनिंग टाळले, म्हणाली…