धोनीसोबत फलंदाजी करणे स्वप्नवत! – राहुल

K.L. Rahul

महेंद्रसिंग धोनीसोबत फलंदाजी करणे हे स्वप्नवत असते, असे विधान भारताचा फलंदाज लोकेश राहुल याने केले. आयसीसी विश्वचषकाआधी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या सराव सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली होती, पण धोनी आणि राहुल यांनी १६४ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. राहुलने १०८ आणि धोनीने ११३ धावांची खेळी केली. त्यांच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळेच भारताला हा सामना जिंकण्यात यश आले. या सामन्यानंतर धोनीसोबत मला फलंदाजी करायला नेहमीच मजा येते, असे राहुल म्हणाला.

बांगलादेशविरुद्ध आम्ही जेव्हा ४ विकेट फार कमी धावांत गमावल्या, तेव्हा मला आणि धोनीला चांगली भागीदारी करणे गरजेचे झाले होते. आम्ही खेळपट्टीवर असताना एकमेकांशी फार चर्चा करत नव्हतो, कारण या सामन्यात कशी फलंदाजी करायची याच्या आम्ही दोघांनीही वैयक्तिक योजना आखल्या होत्या. धोनीसोबत फलंदाजी करणे हे स्वप्नवत असते आणि मागील २-३ वर्षांत आम्ही काही चांगल्या भागीदारी केल्या आहेत. त्याच्यासोबत फलंदाजी करायला मला नेहमीच मजा येते. त्याने या सामन्यात खूप अप्रतिम फलंदाजी केली. त्याने फिरकीपटूंविरुद्ध खूपच आक्रमक फलंदाजी केली आणि अगदी पहिल्या चेंडूपासूनच तो चांगले फटके मारत होता. त्यामुळे हा सामना आम्हा दोघांसाठी खूप चांगला राहिला, असे राहुलने सांगितले.

राहुलची खेळी सर्वात सकारात्मक गोष्ट – विराट कोहली

विश्वचषक सुरु होण्याआधी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत बरीच चर्चा झाला आहे. मात्र, लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावल्यामुळे भारताची चिंता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने राहुलची स्तुती केली. तो म्हणाला, राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ज्याप्रमाणे खेळ केला, ती आमच्यासाठी सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. इतर खेळाडूंना त्यांच्या भूमिका माहित आहेत. राहुलने धावा करणे ही आमच्या संघासाठी महत्त्वाची गोष्ट होती. तो खूपच अप्रतिम फलंदाज आहे.