घरक्रीडाSL vs BAN : चमीराचा भेदक मारा; तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा

SL vs BAN : चमीराचा भेदक मारा; तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा

Subscribe

श्रीलंकेचा कर्णधार कुसाल परेराने १२२ चेंडूत १२० धावांची खेळी केली.

वेगवान गोलंदाज दुष्मन्थ चमीराने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा ९७ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यापूर्वीच बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. मात्र, श्रीलंकेला या मालिकेचा शेवट विजयाने करण्यात यश आले. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसाल परेराने १२२ चेंडूत १२० धावांची खेळी केली. त्याची या मालिकेपूर्वी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. त्यामुळे कर्णधार म्हणून हे त्याचे पहिले शतक ठरले. तर गोलंदाजीत चमीराने भेदक मारा केला. त्याने ९ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.

परेरा, डी सिल्वाची चांगली फलंदाजी

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार परेराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दानुष्का गुणथिलका (३९) आणि परेरा (१२०) या सलामीवीरांनी श्रीलंकेच्या डावाची चांगली सुरुवात केली. यानंतर परेराला कुसाल मेंडिस (२२) आणि धनंजय डी सिल्वा (नाबाद ५५) यांची उत्तम साथ लाभली. अखेरच्या षटकांमध्ये डी सिल्वा आणि वनिंदू हसरंगा (१८) यांनी काही चांगले फटके मारल्याने श्रीलंकेने ५० षटकांत ६ बाद २८६ अशी धावसंख्या उभारली. बांगलादेशच्या तस्कीन अहमदने ४ विकेट घेतल्या.

- Advertisement -

मोसादेक, महमुदुल्लाहची अर्धशतके वाया

२८७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या मोहम्मद नईम (१), शाकिब अल हसन (४) आणि कर्णधार तमिम (१७) यांना चमीराने झटपट बाद केले. त्यामुळे बांगलादेशची ३ बाद २८ अशी अवस्था झाली होती. यानंतर मुशफिकूर रहीम (२८), मोसादेक हुसेन (५१) आणि महमुदुल्लाह (५३) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने बांगलादेशचा डाव १८९ धावांत आटोपला आणि श्रीलंकेने हा सामना ९७ धावांनी जिंकला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -