घरक्रीडाBen Stokes : बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार, ECB ने...

Ben Stokes : बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार, ECB ने केली घोषणा

Subscribe

स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. जो रूटच्या राजीनाम्यानंतर स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोसह अनेक खेळाडू इंग्लंडचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत होते. अखेर बेन स्टोक्सच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडसाठी ७९ कसोटी सामने खेळले असून ५ हजार ६१ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने १७४ विकेट्सही घेतल्या आहेत. १६१ धावांत आठ बळी ही त्याची कसोटीमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. तर २५८ त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बेन स्टोक्स दीर्घकाळापासून इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत ऐतिहासिक खेळी खेळली. कसोटी कर्णधार झाल्यानंतर त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांचे भवितव्य ठरवण्याचे. दोन्ही दिग्गज गोलंदाजांची ही जोडी इंग्लंडकडून दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या दोन्ही गोलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात समावेश करण्यात आला नव्हता. आता या दोन दिग्गजांच्या भवितव्याचा निर्णय स्टोक्सला घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

३० वर्षीय स्टोक्सची इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करताना, इंग्लंडचे पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले, बेन स्टोक्सला कसोटी कर्णधार बनवण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही. इंग्लंड संघाला कसोटी क्रिकेटच्या नव्या युगात नेण्यासाठी आवश्यक असलेला दृष्टिकोन यात स्टोक्स बसतो. तो नवीन संधीसाठी तयार आहे. तो त्यास पात्र आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा १-० असा पराभव झाल्यानंतर जो रूट कर्णधारपदावरून पायउतार झाला. या मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये तळाला पोहोचला आहे. आता स्टोक्सवर संघाला उंचावण्याची जबाबदारी असेल. २०२१-२३ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून इंग्लंड संघाची अवस्था वाईट आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत होण्यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावली होती.

- Advertisement -

अँडरसन-ब्रॉडच्या भवितव्याबाबत निर्णय होणार

गेले एक दशकात इंग्लंडसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. हे दोन्ही दिग्गज याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विशेष काही करू शकले नव्हते. यानंतर दोघांच्याही जागांवर प्रश्नचिन्ह उपस्थि झाले. त्यामुळे आता इंग्लंडच्या कसोटी संघात या दोघांच्या पुनरागमनाच्या आशा संपल्या आहेत. मात्र, आगामी काळात दोघांनाही संधी मिळू शकते, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

आता इंग्लंडला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे, तर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेला एक सामनाही खेळायचा आहे. यादरम्यान अँडरसन आणि ब्रॉडच्या पुनरागमनावर निर्णय घेतला जाईल. इंग्लंडचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -