घरक्रीडासेरेनाचा आव्हान संपुष्टात, जोकोविच उपांत्य फेरीत

सेरेनाचा आव्हान संपुष्टात, जोकोविच उपांत्य फेरीत

Subscribe

यंदाचे स्पर्धा जिंकण्याची प्रमुख दावेदार मानल्या जाणार्‍या २३ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक (२४) ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना प्लिस्कोवाने पराभव केला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत काई निशिकोरीला दुखापतीमुळे अर्ध्या सामन्यातून माघार घ्यावी लागल्याने नोवाक जोकोविचने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सेरेना विल्यम्सचा चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने ४-६, ६-४, ५-७ असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये प्लिस्कोवाकडे ३-३ अशी बरोबरी असताना सेरेना सर्व्हिस करत होती. ही सर्व्हिस मोडत प्लिस्कोवाने ४-३ अशी आघाडी मिळवली आणि नंतर तिने आपली सर्व्हिस राखली. यानंतर सेरेनाने सर्व्हिस राखली, पण तिला प्लिस्कोवाची सर्व्हिस मोडता आली नाही आणि तिने हा सेट गमावला. मात्र दुसर्‍या सेटमध्ये सेरेनाने दमदार पुनरागमन केले. तिने हा सेट ६-४ असा जिंकला. तिसर्‍या आणि निर्णायक सेटची सेरेनाने अप्रतिम सुरुवात केली. तिने या सेटमध्ये ५-१ अशी मोठी आघाडी मिळवली. मात्र यानंतर प्लिस्कोवाने सलग ५ गेम जिंकत ६-५ अशी आघाडी मिळवली. तिनेच पुढची गेम जिंकत हा सेट आणि सामना जिंकला. तसेच मागील वर्षी अमेरिकन ओपन जिंकणार्‍या जपानच्या नाओमी ओसाकाने एलिना स्विटोलीनावर ६-४,६-१ अशी मात करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल सीडेड नोवाक जोकोविचविरुद्धच्या सामन्यात जपानच्या काई निशिकोरीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. या सामन्याच्या पहिल्या सेट अखेरीस निशिकोरीच्या पायाला दुखापत झाली. त्याने हा सेट ६-१ असा गमावला. मात्र त्याने पुढे खेळण्याचा प्रयत्न केले. पण दुसर्‍या सेटमध्ये जोकोविचकडे ४-१ अशी आघाडी असताना निशिकोरीची दुखापत वाढल्याने त्याने सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे जोकोविचने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर उपांत्यपूर्व फेरीत मिलॉस रॉनीचला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा फ्रान्सच्या लुकास पॉउलीने ७-६, ६-३, ६-७, ६-४ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -