Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ENG vs PAK : बाबर आझमचे शतक वाया; तिसऱ्या वनडेतील विजयासह इंग्लंडचा...

ENG vs PAK : बाबर आझमचे शतक वाया; तिसऱ्या वनडेतील विजयासह इंग्लंडचा पाकला व्हाईटवॉश

इंग्लंडच्या जेम्स विन्सने ९५ चेंडूत १०२ धावा केल्या.

Related Story

- Advertisement -

कर्णधार बाबर आझमच्या शतकानंतरही पाकिस्तानला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने हा सामना ३ विकेट आणि १२ चेंडू राखून जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तानला ३-० असा व्हाईटवॉश दिला. या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मालिकेला सुरुवात होण्याआधी एक दिवस इंग्लंडला बेन स्टोक्सच्या नेतृत्वात संपूर्ण नव्या संघाची निवड करावी लागली. परंतु, याचा इंग्लंडच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. नवख्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने या एकदिवसीय मालिकेचे तिन्ही सामने जिंकले.

बाबरच्या १५८ धावा 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान अवघ्या ६ धावा करून बाद झाला. यानंतर मात्र कर्णधार बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत ९२ धावांची भागीदारी रचली. इमामला ५६ धावांवर लेगस्पिनर मॅट पार्किन्सनने बाद केले. बाबरने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवली. त्याला पुढे मोहम्मद रिझवानची उत्तम साथ लाभली. या दोघांनी १७९ धावांची भागीदारी रचली. रिझवानने ५८ चेंडूत ७४ धावांची खेळी केल्यावर त्याला ब्रायडन कारसेने बाद केले. बाबाझने उत्कृष्ट फलंदाजी करत १३९ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १५८ धावा फटकावल्या. त्यामुळे पाकिस्तानने ५० षटकांत ९ बाद ३३१ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या कारसेने ६१ धावांत ५ विकेट घेतल्या.

विन्स-ग्रेगरीची १२९ धावांची भागीदारी

- Advertisement -

३३२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाच्या सुरुवातीला सलामीवीर फिल सॉल्ट (२२ चेंडूत ३७) आणि झॅक क्रॉली (३४ चेंडूत ३९) यांनी आक्रमक फलंदाजी केली. तसेच कर्णधार स्टोक्सने २८ चेंडूत ३२ धावा केल्यावर त्याला लेगस्पिनर शादाब खानने माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची ५ बाद १६५ अशी अवस्था झाली होती. मात्र, जेम्स विन्सने एक बाजू लावून धरत ९५ चेंडूत १०२ धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. त्याला लुईस ग्रेगरीने चांगली साथ देताना ६९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. विन्स आणि ग्रेगरी यांनी सहाव्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचल्यावर या दोघांनाही हॅरिस रौफने बाद केले. परंतु, क्रेग ओव्हर्टन (नाबाद १८) आणि कारसे (नाबाद १२) यांनी २९ धावांची अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

- Advertisement -