ENG vs PAK : इंग्लंडच्या विजयात रॉयची चमक; पाकविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली

इंग्लंडने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली.

england win t20 series vs pakistan as jeson roy scores fifty
जेसन रॉयचे अर्धशतक; इंग्लंडने पाकविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली

सलामीवीर जेसन रॉयचे फटकेबाज अर्धशतक आणि लेगस्पिनर आदिल रशिदच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर तीन विकेट राखून मात केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची ही टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली होती. तर इंग्लंडने १५५ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत गाठत हा सामना जिंकला. इंग्लंडमधील २०२१ मोसमातील हा अखेरचा मर्यादित षटकांचा सामना होता आणि इंग्लंडला मोसमाची विजयी सांगता करण्यात यश आले.

रिझवानची नाबाद ७६ धावांची खेळी 

मँचेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर यांनी डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ४२ धावांची सलामी दिल्यावर बाबरला (११) आदिल रशिदच्या गोलंदाजीवर जॉस बटलरने यष्टिचित केले. यानंतर रशिद आणि मोईन अलीच्या फिरकीपुढे पाकिस्तानचा डाव गडगडला. रिझवानने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ५७ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडकडून रशिदने ३५ धावांत ४ विकेट, तर मोईनने १९ धावांत १ विकेट घेतली.

रॉयची सुरुवातीपासून फटकेबाजी

१५५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने सुरुवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ३६ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६४ धावांची खेळी केल्यावर त्याला लेगस्पिनर उस्मान कादिरने बाद केले. यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. डाविड मलान संयमाने फलंदाजी करत ३३ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. परंतु, अखेरच्या षटकांत कर्णधार इयॉन मॉर्गनने (१२ चेंडूत २१) केलेल्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला अखेरच्या षटकात विजय मिळवण्यात यश आले. पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.