IND vs ENG : स्टोक्सच्या अर्धशतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला; पहिला डाव २०५ धावांत गारद  

भारताकडून अक्षर पटेलने ४ विकेट, तर अश्विनने ३ विकेट घेतल्या.

ravichandran ashwin
रविचंद्रन अश्विन

भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. अडखळत्या सुरुवातीनंतर बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला डॅन लॉरेन्स (४६) व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने ४ विकेट, तर अश्विनने ३ विकेट घेतल्या. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिबली (२) आणि झॅक क्रॉली (९) यांना झटपट बाद केले. तर कर्णधार जो रूट (५) आणि जॉनी बेअरस्टो (२८) यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद ७८ अशी अवस्था होती.

स्टोक्सची ५५ धावांची खेळी

स्टोक्स आणि ऑली पोप यांनी पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. स्टोक्सने १२१ चेंडू खेळून काढत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला वॉशिंग्टन सुंदरने पायचीत पकडत इंग्लंडला आणखी एक झटका दिला. यानंतर लॉरेन्सने एकाकी झुंज देत ४६ धावांची खेळी केली. परंतु, तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने इंग्लंडचा डाव २०५ धावांत गारद झाला.