नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रुप अ मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तानसह बांग्लादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे ग्रुप ब मध्ये अद्यापही उपांत्य फेरीसाठी तीन संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कारण 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. यामुळे इंग्लंड संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यानंतर इंग्लंड संघाला औपचारिकता म्हणून या स्पर्धेतील तिसरा आणि अंतिम सामना 1 मार्च रोजी खेळायचा आहे. मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. (England captain Jos Buttler resigns after exit from ICC Champions Trophy)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 351 धावांचा सर्वाधिक आव्हानाचा पाठलाग सहज केला. यानंतर दुसऱ्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने इंग्लंडला पराभूत केले. त्यामुळे इंग्लंड संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 8 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सांगितले होते की, तो त्याच्या भविष्याबद्दल संघ व्यवस्थापन आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सोबत चर्चा करेल. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो इंग्लंडकडून खेळत राहील. याशिवाय अधिक चांगली कामगिरी करू शकेल, असा विश्वासही बटलरने व्यक्त केला.
BREAKING: Jos Buttler has stood down as England white-ball captain, following his side’s Champions Trophy exit 🚨 pic.twitter.com/BQ5yiy4yTa
— Sky Sports Cricket (@SkyCricket) February 28, 2025
पद सोडण्याची हीच योग्य वेळ
कर्णधारपद सोडण्याबाबत बोलताना जोस बटलर म्हणाला, मी इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य निर्णय असेल. संघाचे नेतृत्व जो करेल तो या संघाला पुढे घेऊन जाईल असा विश्वास आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्याने दुःख आणि निराशा आहे. कारण माझ्या कर्णधारपदासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती. पण निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत. त्यामुळे मला वाटतं की पद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.
हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : लाजिरवाण्या कामगिरीनंतरही पाकिस्तानी संघ होणार मालामाल
इंग्लंड संघाकडून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न
जोस बटलरने कर्णधारपद सोडल्यानंतर आता इंग्लंड संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचे कर्णधार पद कोणाले मिळते? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्नही इंग्लंड संघाचा असेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत साखळी फेरीत विजयाची हॅटट्रिक करणार का? हेही पाहावे लागेल.