ENG vs AUS Ashes series 2021: पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा; बेन स्टोक्सचे पुनरागमन

पहिल्या ॲशेस मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या १२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे

ॲशेस मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या १२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. इंग्लंडच्या संघाला पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच जेम्स अँडरसनच्या रूपात मोठा झटका बसला होता. ८ डिसेंबर २०२१ म्हणजेच बुधवार पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील लोकप्रिय ॲशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र पहिल्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीच्या कारणास्तव संघातून बाहेर गेला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाने यापूर्वीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. तर इंग्लंडच्या संघाने सामन्याच्या एक दिवसापूर्वी आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन झाले आहे.

तर दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या अँडरसनच्या जागेवर ऑली रॉबिन्सन किंवा मार्क वुड या दोघातील कोणत्याही एका खेळाडूचा इंग्लंडच्या संघात समावेश होऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या कसोटीतून अँडरसन संघातून बाहेर गेल्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडवर संघाच्या गोलंदाजीची कमान असणार आहे.

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, जॅक लीच, डेव्हिड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड,

दरम्यान, बेन स्टोक्स सोबत इंग्लंडला लीड्समध्ये अविस्मणीय विजय मिळवून देणाऱ्या जॅक लीचचा एकमेव फिरकीपटू संघात समावेश करण्यात आला आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कर्णधार जो रूट, डेव्हिड मलान, ऑली पोप हे ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटी सामन्यात खेळतील.

तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा याआधीच केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात ॲलेक्स कॅरी ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. ८ डिसेंबरला गाबाच्या मैदानावर पहिला कसोटी सामना होणार आहे. ॲशेस मालिकेवर सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा ताबा आहे. २०१९ मध्ये झालेली ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीची ठरली होती.

पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

मार्कस हॅरिस, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोस हेझलवुड,


हे ही वाचा: http://IND vs SA : अजिंक्य रहाणेला मिळू शकते संधी; भारताबाहेरील आकडेवारी बोलकी