Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : भारताच्या 'या' खेळाडूला लवकर बाद करणे गरजेचे; जो...

IND vs ENG : भारताच्या ‘या’ खेळाडूला लवकर बाद करणे गरजेचे; जो रूटचे मत 

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला रूट बोलत होता.

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला लवकर बाद करणे गरजेचे आहे, असे विधान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने केले. भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला तो बोलत होता. पंत सध्या चांगल्या फॉर्मात असून फलंदाजी आणि यष्टिरक्षणात महत्वाचे योगदान देत आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याने अर्धशतके केली. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दोन मॅचविनिंग अर्धशतके केली होती. त्यामुळे इंग्लंडला पंतपासून सावध राहावे लागणार आहे, असे रूटला वाटते.

त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे अवघड

पंत उत्कृष्ट खेळाडू असून काही अविश्वसनीय फटके मारतो. तो आक्रमक शैलीत खेळत असल्याने त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे फार अवघड आहे. मात्र, आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत त्याला वेगाने धावा करण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आम्ही त्याला लवकर बाद केले पाहिजे किंवा तो नॉन-स्ट्राईकवर कसा जाईल, हे पाहिले पाहिजे. पंत फार प्रतिभावान खेळाडू आहे. तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. परंतु, तो फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात प्रतिस्पर्धी संघाला त्याला बाद करण्याची संधी देतो. आम्ही त्या संधीचा उपयोग करणे गरजेचे आहे, असे रूट म्हणाला.

अँडरसन-ब्रॉड एकत्र खेळणार?

- Advertisement -

भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड खेळला होता, तर पहिल्या कसोटीत जेम्स अँडरसनला संधी मिळाली होती. हे दोघे अनुभवी गोलंदाज तिसऱ्या कसोटीत एकत्र खेळू शकतील का? असे विचारले असता रूट म्हणाला, हो नक्कीच. आमचे सर्वच गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे कोणत्याही गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्याआधी आम्हाला खूप विचार करावा लागत आहे.

- Advertisement -