भारतीय महिलांची विजयी सलामी

तिरंगी मालिकेत इंग्लंडवर ५ विकेट राखून मात

कर्णधार हरमनप्रीत कौरची अप्रतिम फलंदाजी आणि फिरकीपटूंच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिरंगी मालिकेतील सलामीच्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट राखून मात केली. या विजयामुळे भारताने २ गुणांची कमाई केली. या सामन्यात इंग्लंडने दिलेले १४८ धावांचे आव्हान भारताने अखेरच्या षटकात पूर्ण केले. भारताच्या हरमनप्रीतने ३४ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४२ धावांची खेळी केली.

या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने इंग्लंडच्या सलामीवीर एमी जोन्स (१) आणि डॅनी वॅट (४) यांना झटपट माघारी पाठवले. यानंतर कर्णधार हेथर नाईट आणि नॅटली स्किवर यांनी २९ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राधा यादवने स्किवरला (२०) बाद करत ही जोडी फोडली. पुढे नाईट (६७) आणि टॅमी ब्यूमोंट (३७) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडने २० षटकांत ७ बाद १४७ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (१५) आणि शेफाली वर्मा यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मानधना बाद झाल्यावर शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्स या युवा फलंदाजांनी ३७ धावा जोडत भारताच्या डावाला आकार दिला. शेफालीला ३० धावांवर नाईटने, तर जेमिमाला २६ धावांवर कॅथरीन ब्रँटने माघारी पाठवले. यानंतर हरमनप्रीतने भारताच्या डावाची सूत्रे हाती घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : २० षटकांत ७ बाद १४७ (नाईट ६७, ब्यूमोंट ३७; गायकवाड २/१९, दिप्ती शर्मा २/३०) पराभूत वि. भारत : १९.३ षटकांत ५ बाद १५० (हरमनप्रीत नाबाद ४२, शेफाली ३०; ब्रँट २/३३).