Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा खेळता येईना अंगण वाकडे

खेळता येईना अंगण वाकडे

इंग्लंडविरुध्द चेपॉकची दुसरी कसोटी भारताने 317 धावांनी जिंकून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. चेपॉकची पहिली कसोटी 241 धावांनी जिंकून मालिकेत विजयी सलामी देणार्‍या इंग्लंडने दुसरी कसोटी गमावल्यावर खेळपट्टीवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरही चेन्नईच्या खेळपट्टीची चर्चा रंगली. ‘ही खेळपट्टी खेळण्यालायक नव्हती’ (अनप्लेएबल) असा टीकेचा सूर इंग्लंडच्या पाठीराख्यांनी (इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन) लावला. याला खेळता येईना अंगण वाकडे, असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.

Related Story

- Advertisement -

चेन्नईची खेळपट्टी चांगली नव्हती असं वादासाठी तूर्तास मान्य केलं तरी ही खेळपट्टी वाईट होती त्यामुळे इंग्लंडचे समर्थक संतापले. अांतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) साकडे घालून वाईट खेळपट्टी बनविणार्‍या भारताचे गुण कमी यावेत जेणेकरुन याचा फटका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचे गुण कमी व्हावेत ही इंग्लंडच्या समर्थकांची मागणी. परंतु, या खेळपट्टीवर दोन भारतीय फलंदाजांनी शतके फटकावली, त्यापैकी एक शतक आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या रवीचंद्रन अश्विनचे ! भारताने दोन्ही डावात जवळपास त्रिशतकी मजल मारली (329 + 286 = 615) याउलट पहिल्या कसोटीत 578 धावा फटकावणार्‍या इंग्लंडला दुसर्‍या कसोटीत दोनशेची मजलही गाठता आली नाही. (134 + 164 = 298) असं असून देखील इंग्लंडच्या पाठिराख्यांचा रडका सूर कायम, ‘खेळपट्टी खेळण्यालायक नव्हती’.

खतरनाक खेळपट्ट्यांचा खेळ क्रिकेटला काही नवा नाही. जगभरात (कसोटी क्रिके्रटच्या छोट्याशा 12 देशांच्या दुनियेत ) खेळपट्ट्यांची अशी अनेक मासलेवाईक उदाहरणे देता येतील म्हणून काही खेळ थांबलेला नाही. तीन वर्षापूर्वी जोहान्सबर्ग कसोटीत भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. उभय संघांचे दोन्ही डाव आटोपले. 40 विकेटच्या मोबदल्यात धावा झाल्या फक्त 805 ! गोलंदाजांनी गाजवलेल्या या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या दाढीधारी हाशीम अंमलाने दोन्ही डावात अर्ध शतके झळकावली. भारताकडून कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने सामन्यात सर्वाधिक 86 धावा केल्या. खतरनाक खेळपट्टीवरही दर्जेदार फलंदाज आपला ठसा उमठवू शकतात. ‘फ्रीडम ट्रॉफीची’ ही मालिका मात्र यजमान दक्षिण आफिके्रने 2-1 अशी जिंकली.

- Advertisement -

खेळपट्टी कशीही असो, या खेळपट्टीशी जुळवून घेणारा संघ बाजी मारतो. रडके डावपेच लढवणार्‍या इंग्लंडच्या पाठिराख्यांना ही बाब कोण समजवणार ? पराभव पचवणं त्यांना नेहमीच जड जातं. इंग्लंडमध्ये इंग्लंड संघ खेळतो तेव्हा प्रतिस्पर्धांना हिरव्यागार खेळपट्ट्या तसेच थंड वातावरणाचा मुकाबला करावा लागतो. खास करुन आशियाई खंडातील देशांना. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे दक्षिण आशियाई देश मात्र कुठलीही सबब पुढे न करता निमूटपणे इंग्लंडमध्ये इंग्लंडशी दोन हात करतात.

चेन्नईत लागोपाठ दोन कसोटी सामने खेळवण्यात आले. भारतीय क्रिकेटच्या नऊ दशकांच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली. लागोपाठ दोन कसोटींचे यजमानपद भूषविण्याचा मान चेन्नईला मिळाला. पहिल्या कसोटीत इंग्लंडने बाजी मारली. दुसर्‍या कसोटीत यजमान भारताने इंग्लंडला चारी मुंड्या चीत केल्यावर चेपॉकची खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती अशी टीका इंग्लंडच्या पाठीराख्यांनी केली. 1950-60 च्या दशकात क्रिकेटजगतात इंग्लंडची मक्तेदारी होती. एमसीसीला क्रिकेट नियमावली करण्याचे अधिकार होते, अजूनही आहेत. परंतु अलिकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा (आयसीसी) समितीचा यात हस्तक्षेप असतो. भारताची फिरकी चौकडी (प्रसन्ना, वेंकट, चंद्रशेखर, बेदी) फॉर्मात असताना टीसीसीबीने (टेस्ट अ‍ॅन्ड कौंटी क्रिकेट बोर्ड) नियमात हेतुपुरस्सर बदल करुन लेग साईडच्या क्षेत्ररक्षकांवर निर्बंध आणले जेणेकरुन भारतीय फिरकी आक्रमण बोथट होईल अशी इंग्लंडची धारणा होती. रडके डावपेच खेळण्यात इंग्लंडचा हातखंडा ! 70-80 च्या दशकात विंडीजच्या दहशतवादी आक्रमणाला (तोफखान्याला) रोखण्यासाठी दिवसाला 90 षटके टाकण्याचा नियम अंमलात आणण्यास इंग्लंडने प्रमुख भूमिका बजावली.

- Advertisement -

मायदेशात खेळताना इंग्लंडने बव्हंशी आपल्या संघाला अनुकुल अशा खेळपट्ट्या बनविल्या आहेत. अ‍ॅशेस मालिकेत अनेकदा त्यांनी हे ‘प्रयोग’ यशस्वीपणे राबविले असून इतरांना ‘ज्ञान’ देण्यात ते आघाडीवर आहेत. एका दशकापूर्वी 2011 च्या मोसमात इंग्लंडने धोनीच्या भारतीय संघाचा 4-0 असा फडशा पाडला. लॉर्डसच्या सलामीच्या कसोटीत भारताचा प्रमुख तेज गोलंदाज झहीर खानला दुखापत झाली, भारताला हा मोठा धक्काच. एजबॅस्टन, बर्मिगहॅम तसेच ओव्हल कसोटीत भारताला मार खावा लागला. ड्यूक चेंडू चांगलेच स्विंग, सीम होत होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली.

चेन्नईच्या दुसर्‍या कसोटीत भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली ती अष्टपैलू अश्विन (106 धावा आणि 96 धावात 8 बळी) तसेच शतकवीर रोहित शर्मा यांनी. या कसोटीत नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूने लागला. त्याचा पुरेपुर फायदा रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, या मुंबईकर जोडींने उठवला. त्यांच्या फटकेबाज शतकी भागिदारीमुळे भारताने पहिल्याचा दिवशी त्रिशतकी मजल मारली. जॅक लिच्, मोईन अली या इंग्लंडचा फिरकी जोडगोळीचा यथेच्छ समाचार घेत रोहित-अजिंक्य यांनी भारतीय विजयाचा पाया रचला. अँडरसनला विश्रांती देत स्टुअर्ट ब्रॉडला इंग्लंडने संधी दिली, पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. रिषभ पंथने आक्रमक फलंदाजीचा वसा कायम राखत तडाखेबंद अर्धशतक तडकावले.

अश्विन, अक्षर पटेल या फिरकी जोडगोळीने पाहुण्या इंग्लंडच्या निम्मा संघ गारद केला. कसोटी पदार्पणात अक्षरची डावखुरी फिरकी प्रभावी ठरली. चेपॉकच्या फिरकला अनुकुल खेळपट्टीवर त्याने अचूक मारा करत दुसर्‍या डावात इंग्लंडचे पाच मोहरे टिपले. प्रथम श्रेणी क्रिकेट, वन डे, टी-20 क्रिकेट या विविध प्रकारच्या क्रिकेटमध्ये गुजरातच्या या गुणी खेळाडुने संधी मिळताच आपली कामगिरी चोख बजावली. वामन कुमार, दिलीप दोशी या फिरकीपटुंप्रमाणे अक्षर पटेलने कसोटी पदार्पणात पाच मोहरे टिपले. सध्या विलक्षण फॉर्मात असणार्‍या इंग्लंड कर्णधार ज्यो रुटचा अडसर त्याने दोन्ही डावात दूर केला. ऑफस्पिनर अश्विनने या मालिकेत आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दोन कसोटीत 17 मोहरे टिपले असून दुस-या कसोटीत शतकही झळकावले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अन् इंग्लंडविरुध्द पहिले शतक. रिषभ पंतच्या पटकेबाजीने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले असून फलंदाजीतील सातत्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावलाय. त्याच्या यष्टिरक्षणातही सफाई दिसून येते. दुसर्‍या कसोटीत पंतने दोन झेल तसेच दोन यष्टीचित केले. संघाच्या विजयात पंतचा खारीचा वाटा आहे.

रोटेशन पॉलिसीचा फटका इंग्लंडला बसला आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. फॉर्मात असलेल्या अँडरसनला विश्रांती देेत ब्रॉडला संधी देण्यात आली. पण त्यांची ही चाल यशस्वी ठरली नाही. 38 वर्षीय अँडरसनला विश्रांती देवून अहमदाबादच्या दिवस-रात्र कसोटीसाठी त्याला ताजातवाना राखण्याचे इंग्लंडचे मनसुबे दिसतात. चेन्नई कसोटीत मात्र इंग्लंडला अँडरसनची उणीव प्रकर्षाने जाणवली. यष्टिरक्षक ज्योस बटलरऐवजी दुसर्‍या कसोटीत बेन फोक्सला संधी मिळताच फोक्सने आपली छाप पाडली. त्याच्या यष्टिरक्षणात सफाई आहेच शिवाय तो उपयुक्त फलंदाजही आहे.

दाढीधारी ऑफस्पीनर मोईन अलीला दुसर्‍या कसोटीत संधी दिली. त्याचा पुरेपुर फायदा उठवत मोईनने सामन्यात 8 मोहरे टिपले शिवाय दुसर्‍या डावात 23 चेंडूत 43 धावा फटकावताना 5 षटकार तसेच 3 चौकारांची आतषबाजी केली. दुर्दैवाची बाब म्हणजे मोईन अली केवळ एका कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतलाय. सतत बायोबबलमध्ये राहिल्यामुळे मोईन विलक्षण कंटाळला. भारतात इंग्लंडने श्रीलंकेचा दौरा केला, त्या दरम्यान त्याला कोविडची बाधा झाल्यामुळे विलगीकरणात रहावे लागले. या सार्‍याचा परिपाक म्हणजे तो मायदेशी परतला. परंतु, एप्रिलमध्ये होणार्‍या आयपीएलमध्ये मोईन खेळणार आहे.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. चेपॉकच्या खेळपट्टीवर खरपूस टीका झाली. इंग्लंडचा कर्णधार ज्योरुटच्या मते ही खेळपट्टी चांगली नव्हती. परंतु या वादावर पडदा टाकून रुट म्हणाला, ‘या खेळपट्टीवर खेळणं आव्हानात्मक होतं. आमचा पराभव झाला’ अशी प्रांजळ कबुली इंग्लंडच्या कर्णधाराने दिली असाच समंजसपणा इंग्लंडच्या पाठीराख्यांनी दाखविल्यास क्रिकेटचं भलं होईल.

- Advertisement -