Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ENG vs PAK : लिविंगस्टनचे झुंजार शतक वाया; पहिल्या टी-२० सामन्यात पाकची...

ENG vs PAK : लिविंगस्टनचे झुंजार शतक वाया; पहिल्या टी-२० सामन्यात पाकची इंग्लंडवर मात

लिविंगस्टनने अवघ्या ४२ चेंडूत शतक झळकावले.

Related Story

- Advertisement -

लियम लिविंगस्टनच्या झुंजार शतकानंतरही इंग्लंडला पहिल्या टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने नॉटिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २३२ अशी धावसंख्या उभारली होती. ही पाकिस्तानची टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. याचा पाठलाग करताना लिविंगस्टनने ४२ चेंडूत शतक झळकावले. इंग्लंडच्या फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये केलेले हे सर्वात जलद शतक ठरले. परंतु, त्याला इतरांची फारशी साथ न लाभल्याने इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या शाहीन शहा आफ्रिदी आणि शादाब खानने ३-३ विकेट घेतल्या.

आझम-रिझवानची १५० धावांची सलामी

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची उत्कृष्ट सुरुवात झाली. कर्णधार बाबर आझम (४९ चेंडूत ८५) आणि मोहम्मद रिझवान (४१ चेंडूत ६३) यांनी १५० धावांची सलामी दिली. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये फखर झमान (८ चेंडूत २६) आणि मोहम्मद हाफिज (१० चेंडूत २४) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद २३२ अशी धावसंख्या उभारली.

लिविंगस्टनची एकाकी झुंज 

- Advertisement -

२३३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर डाविड मलान (६ चेंडूत १), तसेच जॉनी बेअरस्टो (७ चेंडूत ११) आणि मोईन अली (४ चेंडूत १) झटपट बाद झाले. जेसन रॉयने १३ चेंडूत ३२ धावा फटकावल्यावर त्याला शादाब खानने बाद केले. एका बाजूला विकेट जात असताना दुसऱ्या बाजूने लिविंगस्टनने उत्कृष्ट फलंदाजी करत ४३ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. यानंतरचे इंग्लिश फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. त्यामुळे इंग्लंडचा डाव २०१ धावांत आटोपला.

- Advertisement -