वर्ल्डकप घरच्या मैदानावर खेळण्याचा इंग्लंडला होईल फायदा !

Sunil gavaskar
सुनील गावस्करचे मत

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरु होणारा विश्वचषक जिंकण्याचे यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. या दोन्ही संघांनी मागील दोन-तीन वर्षांत खूपच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या संघात १५ खेळाडू कोण असणार हे आता जवळपास निश्चित आहे. विश्वचषकाआधी हे दोन संघच सर्वात संतुलित आहेत असे समीक्षकांचे मत आहे. इंग्लंडला हा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे आणि त्यांना घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा होऊ शकेल, असे मत भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

तुम्ही जर मागील दोन विश्वचषक पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की २०११ मध्ये यजमान भारताने विश्वचषक जिंकला होता, तर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियामध्ये झालेला विश्वचषक जिंकला. त्यामुळे २०१९ मध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे. इंग्लंडला घरच्या मैदानात खेळत असल्याचा फायदा होईल, असे गावस्कर म्हणाले. मात्र, इंग्लंड विश्वचषक जिंकेलच असे मी म्हणत नाही, असे गावस्करांनी स्पष्ट केले.

इंग्लंडमध्ये होणार विश्वचषक ३० मे ते १४ जुलै या कालावधीत होणार आहे. तो जिंकण्याचे प्रमुख दावेदार भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना ३० जूनला एजबॅस्टन स्टेडियम, बर्मिंगहॅम येथे होणार आहे.