घरक्रीडाइंग्लंडचा मालिका विजय

इंग्लंडचा मालिका विजय

Subscribe

पाचव्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर मात

क्रिस जॉर्डन आणि जॉनी बेअरस्टोच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांची ही मालिका ३-२ अशी जिंकली. पाचवा सामना पावसामुळे ११-११ षटकांचा करण्यात आला. यात दोन्ही संघांनी १४६-१४६ धावा केल्याने सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १७ धावा केल्या. याचा पाठलाग करताना जॉर्डनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला १ विकेट गमावत ८ धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना जिंकला.

त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडने ११ षटकांत ५ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्यांनी अवघ्या ५ षटकांत ८३ धावा फलकावर लावल्या. गप्टिलने २० चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या, तर मुनरोने २१ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४६ धावा फटकावल्या. मधल्या फळीतील टीम सायफर्टने १६ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही ११ षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने १८ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४७ धावा केल्या. यानंतर कर्णधार मॉर्गन (७ चेंडूत १७) आणि सॅम करन (११ चेंडूत २४) यांनीही आक्रमक खेळ केला. अखेरच्या षटकाच्या अखेरच्या ३ चेंडूंवर इंग्लंडला जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती. जॉर्डनने एका चेंडूवर षटकार, पुढे २ धावा आणि अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत इंग्लंडला बरोबरी करून दिली.

संक्षिप्त धावफलक –
न्यूझीलंड : ११ षटकांत ५ बाद १४६ (गप्टिल ५०, मुनरो ४६, सायफर्ट ३९; महमूद १/२०) वि. इंग्लंड : ११ षटकांत ७ बाद १४६ (बेअरस्टो ४७, सॅम करन २४; सँटनर २/२०). [सुपर ओव्हर – इंग्लंड बिनबाद १७ विजयी वि. न्यूझीलंड १ बाद ८].

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -