IND vs ENG Fourth T20 : किशन आऊट, सूर्यकुमार इन; इंग्लंडची प्रथम गोलंदाजी 

भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत.

virat kohli and morgan
विराट कोहली आणि इयॉन मॉर्गन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना आज खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच पार पडेल. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ असा पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. मात्र, भारतासाठी या सामन्याची सुरुवात चांगली झालेली नाही. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करत धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला होता. त्यामुळे भारताला आता हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

ईशान किशन सामन्याला मुकणार

भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. दुसऱ्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणाऱ्या ईशान किशनला आजच्या सामन्याला मुकावे लागत आहे. दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळणार नसून त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच लेगस्पिनर राहुल चहरलाही संधी देण्यात आली असून त्याची युजवेंद्र चहलच्या जागी संघात निवड झाली आहे.