लिव्हरपूलची वोल्व्हसवर मात

इंग्लिश प्रीमियर लीग

लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. कर्णधार जॉर्डन हँडरसन आणि रॉबर्टो फार्मिंहो यांनी केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने वोल्व्हसवर २-१ अशी मात केली. यंदाच्या मोसमात अफलातून कामगिरी करणार्‍या लिव्हरपूलने आतापर्यंत २३ पैकी २२ सामने जिंकले असून ६७ गुणांसह ते प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. त्यांच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या गतविजेत्या मँचेस्टर सिटीमध्ये तब्बल १६ गुणांचे अंतर आहे.

लिव्हरपूल आणि वोल्व्हसमधील सामना पूर्वार्धात चुरशीचा झाला. आठव्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या कॉर्नर किकवर कर्णधार हँडरसनने गोल करत लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. काही मिनिटांनंतरच वोल्व्हसच्या मॅट डोहर्थीला गोल करण्याची उत्कृष्ट संधी मिळाली, पण त्याला हेडर गोलवर मारता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलने मध्यंतराला आपली १-० अशी आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर वोल्व्हसने आपला खेळ उंचावला आणि याचा फायदा त्यांना ५१ व्या मिनिटाला मिळाला. अदामा ट्राओरेच्या पासवर स्ट्रायकर रॉल हिमनेसने गोल करत वोल्व्हसला १-१ अशी बरोबरी करून दिली. हिमनेसलाच गोलची आणखी एक संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅलीसनने अडवला. अखेर ८४ व्या मिनिटाला फार्मिंहोने गोल करत लिव्हरपूलला हा सामना २-१ असा जिंकवून दिला.