घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

Subscribe

कर्णधार व्हिन्सेंट कंपनीने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीने इंग्लंडमधील फुटबॉल स्पर्धा प्रीमियर लीगमध्ये लेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीचा संघ लिव्हरपूलला मागे टाकत प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या दोन्ही संघांनी आता ३७ सामने खेळले असून, मँचेस्टर सिटीच्या खात्यात ९५ तर लिव्हरपूलच्या खात्यात ९४ गुण आहेत. त्यामुळे आता येत्या रविवारी होणार्‍या या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवत गतविजेत्या मँचेस्टर सिटीला पुन्हा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवण्याची संधी आहे. मँचेस्टर सिटीचा अखेरचा सामना ब्रायटनशी तर लिव्हरपूलचा अखेरचा सामना वोल्व्हसशी होणार आहे.

मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावधपणे खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. या सामन्याच्या आठव्या मिनिटाला लेस्टरच्या रिकार्डो परेराने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण व्हिन्सेंट कंपनीने अप्रतिम बचाव केल्यामुळे लेस्टरची गोलची पाटी कोरी राहिली. यानंतर सामन्याच्या ३१व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीला गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. इकाय गुंडोगनने मारलेल्या कॉर्नर किकवर सर्जिओ अगुव्हेरोने अप्रतिम हेडर मारला. मात्र, लेस्टरचा गोलरक्षक कॅस्पर श्मायकलने उत्कृष्टपणे चेंडूला गोलमध्ये जाण्यापासून अडवल्याने या सामन्याच्या मध्यांतराला गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर मात्र मँचेस्टर सिटीने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीच्या रहीम स्टर्लिंगला गोल करण्याची संधी होती. मात्र, त्याला हेडर गोलवर मारता आला नाही. पुढे सामन्याच्या ६८व्या मिनिटाला लेस्टरच्या श्मायकलने आपली चमक दाखवत अगुव्हेरोने मारलेला फटका अप्रतिमरित्या अडवला. पुढच्याच मिनिटाला मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कंपनीने मारलेला दमदार फटका श्मायकलला अडवता आला नाही आणि त्यामुळे मँचेस्टर सिटीला १-० अशी बहुमूल्य आघाडी मिळाली. यानंतर मँचेस्टर सिटीच्या भक्कम बचावापुढे लेस्टरची डाळ शिजली नाही आणि मँचेस्टर सिटीने हा सामना १-० असा जिंकला.

व्हिन्सेंट कंपनीने केलेला हा गोल मँचेस्टर सिटीचा या मोसमाच्या सर्व स्पर्धांत मिळून १५७ वा तर प्रीमियर लीगमधील १०० वा गोल होता. तसेच मँचेस्टर सिटीचा हा प्रीमियर लीगमधील सलग १३ वा विजय होता. प्रीमियर लीगच्या इतिहासात केवळ चार वेळा एखाद्या संघाला सलग १३ सामने जिंकण्यात यश आले आहे आणि मँचेस्टर सिटीनेच ही कामगिरी दोनवेळा केली आहे.

- Advertisement -

प्रीमियर लीग गुणतक्ता (अव्वल २)

संघ सामने विजय पराभव अनिर्णित एकूण गुण
मँचेस्टर सिटी ३७ ३१ ४ २ ९५
लिव्हरपूल ३७ २९ १ ७ ९४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -