घरक्रीडाट्वेन्टी-२०मध्ये प्रवेश करताना...

ट्वेन्टी-२०मध्ये प्रवेश करताना…

Subscribe

कला, क्रीडा आणि राजकारण हे भारतीयांचे जिव्हाळ्याच्या विषय! या विषयांविना भारतीयांचे जीवन अपूर्णच आहे. खेळांमध्येही क्रिकेटवर भारतीयांचे विशेष प्रेम. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाकडून आणि क्रिकेटपटूंकडून चाहत्यांना विशेष अपेक्षा असतात. विराट कोहलीच्या भारतीय संघाने यंदाच्या वर्षात चाहत्यांच्या बर्‍याचशा अपेक्षा पूर्ण केल्या. क्रिकेट व्यतिरिक्त नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती यांसारख्या खेळांमध्ये भारतीयांनी विशेष यश संपादले. अ‍ॅथलेटिक्स आणि फुटबॉलमध्ये भारताचा खेळ म्हणावा तसा रंगला नाही. परंतु, एकूणच २०१९ वर्ष हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी आणि २०२० वर्षाचे आशादायी चित्र निर्माण करणारे ठरले, असे म्हणणे वावगे ठरू नये.

कांगारुंना त्यांच्याच मैदानात चारली धूळ

भारतीय क्रिकेट संघाने २०१९ वर्षाची दिमाखात सुरुवात केली. मागील वर्षीच्या अखेरीस भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याला सुरुवात झाली. भारतीय संघाने २०१८ मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मैदानावर चांगली झुंज दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कोहलीचा हा संघ यशस्वी यशस्वी कामगिरी करु शकेल असे म्हटले जात होते. त्यातच स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती भारताच्या पथ्यावर पडणार होती. अ‍ॅडलेड येथे झालेली पहिली कसोटी भारताने ३१ धावांनी जिंकली, पण ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी तब्बल १४६ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी केली. मेलबर्न येथे झालेल्या ’बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताने १३७ धावांनी बाजी मारत मालिकेत आघाडी मिळवली. यानंतरचा चौथा सामना अनिर्णित राहिल्याने कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. भारताच्या या ऐतिहासिक विजयात पुजारा आणि गोलंदाज विशेष चमकले. पुजाराने ३ शतकांच्या मदतीने ५२१ धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटाने मिळून ४८ विकेट्स मिळवल्या.

- Advertisement -

तिसर्‍यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले

भारतीय क्रिकेट रसिकांचे यंदा सर्व लक्ष लागले होते ते इंग्लंडमधील वर्ल्डकपकडे! ही स्पर्धा जिंकण्यासाठी कोहलीच्या संघाला प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यांनी या स्पर्धेची सुरुवातही एका चॅम्पियन संघाप्रमाणे केली. भारताने नऊपैकी सात साखळी सामने जिंकत अगदी आरामात उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत त्यांची गाठ पडली ती न्यूझीलंडशी. पाऊस आणि अव्वल फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासमोर २४० धावांचे आव्हान होते. मात्र, लोकेश राहुल (१), रोहित शर्मा (१) आणि कर्णधार विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. महेंद्रसिंग धोनी (५०) आणि रविंद्र जाडेजा (७७) या सातव्या जोडीने ११६ धावांची भागीदारी करत भारताला सामना जिंकवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, न्यूझीलंडने हा सामना १८ धावांनी जिंकला आणि भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. कोहलीच्या संघाला वर्ल्डकप जिंकता आला नसला, तरी त्याने आणि त्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार खेळ केला. सलामीवीर रोहित शर्माने ९ सामन्यांत ६४८ धावा चोपून काढल्या, ज्यात विक्रमी ५ शतकांचा सामावेश होता. एका वर्ल्डकपमध्ये पाच शतके लगावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज! तसेच कर्णधार कोहलीने सलग पाच सामन्यांत अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला. गोलंदाजीत मोहम्मद शमी अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली.

- Advertisement -

…आणि भारताने डे-नाईट कसोटी खेळलीच!

एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमुळे मागील काही वर्षांत चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयसीसीने डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. २०१५ साली आयसीसीने पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन केले. मात्र, बीसीसीआय आणि कर्णधार कोहलीने बरीच वर्षे डे-नाईट कसोटी खेळण्यास नकार दिला. मात्र, यावर्षी ऑक्टोबरमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याने कोहलीला गुलाबी चेंडूचा डे-नाईट सामना खेळण्यास तयार केलेच. त्यामुळे भारतीय संघाने आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध खेळला. अवघा तीन दिवस चाललेला हा सामना भारताने एक डाव आणि ४६ धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्याला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. हे पाहून कोहली आणि गांगुली या दोघानांही खूप आनंद झाला.

भारतीय क्रिकेटपटूंचा दमदार खेळ

भारताच्या क्रिकेटपटूंनी यंदा मैदान चांगलेच गाजवले. खासकरून सलामीवीर रोहित शर्मासाठी यंदाचे वर्ष अविस्मरणीय ठरले. सलामीवीर म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून एका वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम आता रोहितच्या नावे झाला आहे. रोहितने २०१९ वर्षात २४४२ धावा फटकावल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४९० धावा, कसोटी क्रिकेटमध्ये ५५६ धावा आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३९६ धावा चोपून काढल्या. त्याचा सहकारी कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. २०१९ वर्षात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये तोच अव्वल राहिला. यंदा ४४ सामन्यांत त्याने ६४.६० च्या सरासरीने २४५५ धावा चोपून काढल्या, ज्यात ७ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच युवा सलामीवीर मयांक अगरवालने ८ कसोटी सामन्यांच्या ११ डावांत ६८.५४ च्या सरासरीने ७५४ धावा केल्या, ज्यात दोन द्विशतके आणि एका शतकाचा समावेश होता. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने तिन्ही प्रकारांत मिळून ७७ गडी बाद केले. तसेच यंदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोहरे टिपणार्‍या गोलंदाजांत तो अव्वल स्थानी (४२) राहिला. भारताच्या महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स यांनीही यंदा आपल्या कामगिरीत सातत्य राखले.

सुवर्ण सिंधूची ऐतिहासिक कामगिरी!

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत, साई प्रणित यांसारख्या खेळाडूंमुळे भारताने बॅडमिंटनमध्ये मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यंदाचे वर्ष भारतीय बॅडमिंटनसाठी एका गोष्टीमुळे अविस्मरणीय ठरले आणि ती म्हणजे सिंधूची जागतिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी! स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेवर सिंधूने सुवर्णमोहर उमटवली. जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू! सिंधूने याआधी दोन वेळा रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ती वेगळ्याच जिद्दीने खेळली. तिने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिसर्‍या सीडेड जपानच्या नोझोमी ओकुहारावर २१-७, २१-७ अशी सहज मात केली. याच स्पर्धेत पुरुषांमध्ये साई प्रणितला कांस्यपदक मिळवण्यात यश आले. जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा प्रकाश पदुकोण यांच्यानंतरचा तो केवळ दुसरा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू! मानसी जोशीने दिव्यांग खेळाडूंच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. युवा खेळाडू लक्ष्य सेनने या मोसमात पाच स्पर्धा जिंकत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने थायलंड ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली.

नेमबाजांचा अचूक वेध

भारतीय नेमबाजांची यंदाच्या वर्षातील कामगिरी वाखाणण्याजोगी होती. खासकरून सौरभ चौधरी, मनू भाकर, अंजूम मुद्गिल यांसारख्या युवा नेमबाजांनी आपला स्तर वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीयांनी २०१८ पर्यंत रायफल आणि पिस्तूल प्रकारात केवळ १२ सुवर्णपदके जिंकली होती. मात्र, फक्त २०१९ मध्ये भारतीय नेमबाजांनी १६ सुवर्णपदकांची नोंद करत सर्वांनाच प्रभावित केले. युवा नेमबाजांनी यंदाच्या चार वर्ल्डकपमध्ये मिळून एकूण २२ पदके पटकावली. त्यामुळे भारताचे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू हेसुद्धा ’भारतीय नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्यास आश्चर्य वाटेल’ असे म्हणाले. भारताच्या १५ नेमबाजांनी पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला असून ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी! त्यामुळे पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भारत दमदार कामगिरी करत बर्‍याच पदकांची कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हॉकी संघांचा सातत्यपूर्ण खेळ

भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांनी यंदाच्या वर्षी सातत्यपूर्ण खेळ केला. आठ वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या पुरुष हॉकी संघाने रशियावर, तर महिला हॉकी संघाने अमेरिकेवर मात करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. तसेच या दोन्ही संघांनी टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताचा पुरुष संघ ही स्पर्धा जिंकेल असे अपेक्षित होते. मात्र, महिला गटात जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असणारा ऑस्ट्रेलिया आणि यजमान जपान या संघांचा समावेश असल्याने भारतीय महिला संघाकडून फारशा अपेक्षा केल्या जात नव्हत्या. परंतु, त्यांनी उत्कृष्ट खेळ करत ही स्पर्धा जिंकली. २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे दोन्ही हॉकी खेळले होते. परंतु, महिला संघाला १२ व्या स्थानी समाधान मानावे लागले. तर पुरुष संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यंदा या दोन्ही संघांनी ज्याप्रकारे खेळ केला आहे ते पाहता, त्यांनी पुढील ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून दिल्यास आश्चर्य वाटायला नको.

बॉक्सर्सचा जोरदार पंच!

भारताच्या बॉक्सर्स आणि कुस्तीपटूंनी यंदा चमकदार कामगिरी केली. रशियामध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमित पांघलने (५२ किलो वजनी गट) रौप्यपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो भारताचा पहिला बॉक्सर ठरला. तसेच मनीष कौशिकला या स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्यात यश आले. महिलांमध्ये भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली. सहा वेळेच्या विश्वविजेत्या मेरीने या कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेतील हे तिचे विक्रमी आठवे पदक होते. त्यामुळे मेरी या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली. याच स्पर्धेत जमुना बोरो आणि लोव्हलीना बोर्गोहेन यांनी कांस्य, तर मंजू राणीने रौप्यपदक मिळवले.

कुस्तीपटूंची चमक!

जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या बजरंग पुनियाला जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत पंचांच्या चुकीच्या निर्णयांचा फटका बजरंगला बसला आणि याबाबत त्याने नाराजीही व्यक्त केली. तसेच राहुल आवारेने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. जागतिक सिनियर कुस्ती स्पर्धेत पदक मिळवणारा आवारे हा महाराष्ट्राचा पहिलाच कुस्तीपटू! आवारे आणि बजरंगसह भारताच्या पाच कुस्तीपटूंना जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्यात यश आले. ही भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. भारताच्या तिरंदाजांसाठीही यंदाचे वर्ष लाभदायी ठरले.

या खेळांत अजून सुधारणा गरजेची…

भारताच्या फुटबॉल संघाला यंदाच्या वर्षी फारसे यश मिळाले नाही. वर्ल्डकप पात्रता स्पर्धा आणि आशियाई करंडकात भारताचा संघ प्राथमिक फेरीतच बाहेर पडला. तसेच जागतिक क्रमवारीत या संघाची ११ स्थानांची घसरण झाली आहे. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन, सुमित नागल यांसारख्या खेळाडूंमध्ये सामन्यागणिक सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अव्वल खेळाडूंविरुद्ध विजय मिळवण्यात त्यांना अजून यश आलेले नाही. डेव्हिस कप लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत भारताने स्पर्धेत आगेकूच केली, ही सकारात्मक बाब. अनुभवी लिअँडर पेसने २०२० हे आपल्या कारकिर्दीतील अखेरचे वर्ष असेल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील काळात भारतीय टेनिसची भिस्त आता युवा खेळाडूंच्या खांद्यावर असून त्यांच्या खेळात सुधारणा होणे गरजेचे आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये द्युती चंद, हिमा दास, मोहम्मद अनस यांसारख्या खेळाडूंची कामगिरी समाधानकारक ठरली. मात्र, अ‍ॅथलेटिक्समध्ये आशिया आणि जगातील इतर देशांसोबत स्पर्धा करण्यासाठी भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, हे पुन्हा एकदा दिसून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -