घरक्रीडाEPL : आर्सनलची चेल्सीवर मात 

EPL : आर्सनलची चेल्सीवर मात 

Subscribe

चेल्सीला गोल करण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा करून घेण्यात अपयश आले.

एमिल स्मिथ-रोव्हने केलेल्या गोलच्या जोरावर आर्सनलने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात चेल्सीवर १-० अशी मात केली. या सामन्यात चेल्सीने चांगला खेळ केला. त्यांना गोल करण्याच्या बऱ्याच संधीही मिळाल्या, पण त्यांचा फायदा करून घेण्यात चेल्सीला अपयश आले. आर्सनलचा गोलही चेल्सीचा खेळाडू जॉर्जिन्होने केलेल्या चुकीमुळे झाला. स्मिथ-रोव्हने १६ व्या मिनिटाला गोल करत आर्सनलला आघाडी मिळवून दिली. त्यांनी ही आघाडी अखेरपर्यंत राखली. हा आर्सनलचा ३६ सामन्यांत १६ वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचा संघ ५५ गुणांसह गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे. चेल्सी ६४ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे.

तिसरे स्थान पटकावण्याची संधी गमावली 

दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे होते. मोसमाअंती अव्वल चार असलेले संघच पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे चेल्सीला हा सामना जिंकत तिसरे स्थान पटकावण्याची संधी होती. परंतु, त्यांना तसे करण्यात अपयश आले. चौथ्या स्थानी असलेल्या चेल्सीचे ३६ सामन्यांत ६४ गुण असून पाचव्या स्थानावरील वेस्ट हॅमचे ५८ गुण आहेत. परंतु, वेस्ट हॅमने एक सामना कमी खेळला आहे.

- Advertisement -

मँचेस्टर सिटीला जेतेपद 

दरम्यान लेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडला पराभूत केल्यामुळे मँचेस्टर सिटीचे जेतेपद पक्के झाले आहे. प्रीमियर लीग स्पर्धा जिंकण्याची सिटीची ही मागील दहा वर्षांत पाचवी वेळ होती. सिटीचे यंदा ३५ सामन्यांत २५ विजयांसह ८० गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानावरील मँचेस्टर युनायटेडचे ३५ सामन्यांत ७० गुण आहेत. युनायटेडला उर्वरित तिन्ही सामने जिंकण्यात यश आले तरीही त्यांना सिटीच्या ८० गुणांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -