EPL : आर्सनलची टॉटनहॅमवर मात

इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनलने टॉटनहॅमवर ४-२ अशी मात केली.

पिअर एमरीक-ऑबामीयांग
इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनलने कट्टर प्रतिस्पर्धी टॉटनहॅमचा ४-२ असा पराभव केला. या सामन्यात आर्सनलच्या पिअर एमरीक-ऑबामीयांगने २ गोल केले. तर टॉटनहॅमचा डिफेंडर जॅन व्हर्टोनघनला सामन्याच्या ८५ व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले.

१९ सामने अपराजित 

आर्सनल आणि टॉटनहॅम यांच्यातील सामन्याची सुरुवात आर्सनल चांगली केली. सामन्याच्या ९ व्या मिनिटाला आर्सनलच्या मुस्तफीने मारलेला हेडर टॉटनहॅमचा डिफेंडर जॅन व्हर्टोनघनच्या हाताला लागला. त्यामुळे आर्सनलला पेनल्टी मिळाली. यावर पिअर एमरीक-ऑबामीयांगने गोल करत आर्सनलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर टॉटनहॅमने आपला खेळ सुधारला. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला एरीक डायरने हेडरवर गोल करत टॉटनहॅमला १-१ अशी बरोबरी करून दिली. तर ३४ व्या मिनिटाला टॉटनहॅमला पेनल्टी मिळाली. ज्यावर त्यांचा स्टार स्ट्रायकर हॅरी केनने गोल करत त्यांना २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मध्यंतरानंतर आर्सनल आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ५६ व्या मिनिटाला झाला. ऑबामीयांगने आपला आणि संघाचा दुसरा गोल करत सामन्यात बरोबरी केली. तर ७४ व्या मिनिटाला अॅलेक्सांडर लॅकाझेटने तर ७७ व्या मिनिटाला लुकास टोरेराने गोल करत आर्सनलला हा सामना ४-२ असा जिंकवून दिला. त्यामुळे आर्सनल आता सलग १९ सामने अपराजित आहेत.