IND vs AUS : ‘या’ कारणांसाठी भारतीय संघाचा अभिमान – सुनील गावस्कर 

भारतीय संघाला या मालिकेत बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.

sunil gavaskar
सुनील गावस्कर

ब्रिस्बन येथे होत असलेल्या चौथ्या कसोटीचा काहीही निकाल लागो, सर्व भारतीयांना आपल्या क्रिकेट संघाचा आणि त्यांच्या कामगिरीचा अभिमान बाळगला पाहिजे, असे विधान भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले. गॅबावर होत असलेला चौथा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२४ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या होती. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला आणखी ३२४ धावांची आवश्यकता असून त्यांच्या १० विकेट शिल्लक आहेत. हा सामना अनिर्णित राहिला, तरी भारताला बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखण्यात यश येईल. भारतीय संघाला या मालिकेत बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. परंतु, त्यांनी या आव्हानांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे गावस्कर म्हणाले.

आव्हानांवर केली मात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आणि त्यांना या मालिकेतून माघार घेणे भाग पडले. त्यातच पहिल्या कसोटीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. त्यांच्यापुढे आणखीही काही आव्हाने होती. मात्र, या सर्व आव्हानांवर भारतीय संघाने मात केली. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे गावस्कर म्हणाले.

मानसिकदृष्ट्या कणखर रहावे लागले

भारतीय संघाची या कसोटी मालिकेतील कामगिरी प्रेरणादायी आहे. भारताचे बरेचसे खेळाडू जवळपास पाच महिने कुटूंबापासून दूर आहेत. त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यांचे संघातील बरेच सहकारी दुखापतग्रस्त झाले. या मालिकेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर मानसिकदृष्ट्या कणखर रहावे लागले आहे. मात्र, त्यांनी कधीही झुंज देणे थांबवले नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या या संघाविषयी अभिमान वाटला पाहिजे, असे गावस्कर यांनी सांगितले.