IPL 2020 : धोनीला पुन्हा खेळताना बघण्याची आतुरतेने वाट पाहतोय – सेहवाग 

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीला पुन्हा मैदानात पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे.

MS Dhoni
महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेट खेळलेला नसला तरी तो भारतीय संघात पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु, मागील महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांची निराशा झाली. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीला पुन्हा मैदानात पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे. धोनीला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांप्रमाणेच त्याचा माजी सहकारी विरेंद्र सेहवागही आतुरतेने वाट पाहत आहे.

यंदाचे आयपीएल खास

यंदाचे आयपीएल सर्वांसाठीच खास असणार आहे. चाहते आणि खेळाडूंसाठी, यंदा आयपीएलचे महत्त्व अधिकच वाढले आहे असे मला वाटते. धोनी पुन्हा मैदानात पाहणे हे एक वेगळेच सुख असेल. त्याला पुन्हा मैदानात पाहण्याची मी आतुरतेने वाटत पाहत आहे. तसेच यंदाची स्पर्धा खास असण्याला आणखीही काही कारणे आहेत, असे सेहवाग म्हणाला. धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेते सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, आता तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण

चेन्नईचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार असून हा सामना १९ सप्टेंबरला अबू धाबी येथे होईल. या सामन्यापासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बरेच महिने क्रिकेट बंद असल्याने भारतीय चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण असेल असे सेहवागला वाटते.