घरक्रीडादेशाला अपेक्षा, पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे आव्हानात्मक -मेरी कोम

देशाला अपेक्षा, पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे आव्हानात्मक -मेरी कोम

Subscribe

भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम ही जागतिक सर्वोत्तम महिला बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. जागतिक स्पर्धेबरोबरच तिने एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये तिला कांस्यपदक मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय चाहत्यांना तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे, पण लोकांना तिच्याकडून अपेक्षा असणे ही चांगली गोष्ट असली तरी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे आव्हानात्मक असेल, असे मेरी म्हणाली.

२०२० ऑलिम्पिकमध्ये देशाला माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. लोक माझ्याकडून सुवर्णपदक मिळवण्याची अपेक्षा करतात, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मात्र, लोकांना बोलणे आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवणे खूप सोपे आहे, पण या अपेक्षा पूर्ण करणे सोपे नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणे आव्हानात्मक असेल. आम्हाला अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत आणि मेहनत करायची आहे, असे मेरीने सांगितले.

- Advertisement -

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळवणारी मेरी २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली नव्हती. त्यामुळे ती सध्या पदकाचा नाही, तर २०२० ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा विचार करत आहे. याबाबत ती म्हणाली, या स्पर्धेसाठी पात्र होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यावर पुढील गोष्टींचा विचार करेन. माझ्याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.

वजनी गट बदलण्याची चिंता नाही

- Advertisement -

२०१२ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत ४८ किलो वजनी गट नसल्याने मेरी कोमला ५१ किलो वजनी गटात खेळावे लागले. नुकत्याच झालेल्या प्रेसिडेंट चषक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटातच मेरीने कांस्यपदक मिळवले. वेगवेगळ्या वजनी गटात खेळण्याबाबत विचारले असता ती म्हणाली, वजनी गट बदलण्याची मला चिंता नाही. ४८ किलो वजनी गट आणि ५१ किलो वजनी गट यात फारसा फरक नाही. आता ५१ किलो वजनी गटात खेळण्याचा मला बराच अनुभव आहे आणि मी या गटात खेळण्यासाठी वेगळ्या पद्धतीने सराव करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -