घरक्रीडाभारत विजयाच्या उंबरठ्यावर

भारत विजयाच्या उंबरठ्यावर

Subscribe

दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन; दुसर्‍या डावात ८ बाद १३२

मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही डाव गडगडले. भारताने या सामन्यात आपला पहिला डाव ९ बाद ४९७ वर घोषित केला. याचे उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. त्यामुळे ते ३३५ धावांनी पिछाडीवर होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्यांना फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची दुसर्‍या डावात ८ बाद १३२ अशी अवस्था होती. ते २०३ धावांनी पिछाडीवर होते. भारताला हा सामना एका डावाने जिंकत, या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी केवळ दोन विकेट्सची गरज आहे.

तिसर्‍या दिवशी पहिल्या डावात २ बाद ९ वरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसचा अवघ्या एका धावेवर उमेश यादवने त्रिफळा उडवला. यानंतर पदार्पण करणारा झुबैर हमजा आणि उपकर्णधार टेंबा बवूमा यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. हमजाने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ५६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला ६२ धावांवर माघारी पाठवत रविंद्र जाडेजाने ही जोडी फोडली.

- Advertisement -

पुढच्याच षटकात शाहबाझ नदीमने बवूमा ३२ धावांवर बाद केले. नदीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिली विकेट होती. यानंतर केवळ जॉर्ज लिंडेला (३७) दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. भारताकडून उमेशने ३, तर शमी, नदीम आणि जाडेजा यांनी २-२ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिका ३३५ धावांनी पिछाडीवर असल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला.

दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज कामगिरीत सुधारणा करतील अशी आशा होती. मात्र, शमी आणि उमेशच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची १७ व्या षटकात ५ बाद ३६ अशी अवस्था झाली. त्यातच उमेशचा अधिक उसळी घेतलेला चेंडू सलामीवीर डीन एल्गरच्या डोक्याला लागल्याने त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. लिंडे आणि पीड या दक्षिण आफ्रिकेच्या सहाव्या जोडीने काही काळ चांगली फलंदाजी करत ३१ धावांची भागी केली. मात्र, लिंडेला नदीमने धावचीत केले. एल्गरच्या जागी थानीस डी ब्रूनला खेळण्याची संधी मिळाली. त्याने पीडसह ३१ धावांची भागीदारी केली. पीडला २३ धावांवर जाडेजाने, तर कागिसो रबाडाला अश्विनने १२ धावांवर बाद केले. त्यामुळे दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची ८ बाद १३२ अशी अवस्था होती. डी ब्रून ३० आणि नॉर्खिया ५ धावांवर नाबाद होता.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –
भारत : पहिला डाव – ९ बाद ४९७ घोषित वि. दक्षिण आफ्रिका : १६२ (हमजा ६२, लिंडे ३७; उमेश ३/४०, जाडेजा २/१९, नदीम २/२२, शमी २/२२) आणि ८ बाद १३२ (डी ब्रून नाबाद ३०, लिंडे २७; शमी ३/१०, उमेश २/३५).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -