घरक्रीडाविंडीजवरील पहिल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव!

विंडीजवरील पहिल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव!

Subscribe

भारतीय क्रिकेटसाठी १९ एप्रिल हा दिवस खास आहे. १९७१ मध्ये याच दिवशी भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. या ऐतिहासिक मालिका विजयाला आता ५० वर्षे पूर्ण झाली. भारताचा १८ वर्षांत हा विंडीजचा तिसरा दौरा होता. अजित वाडेकरच्या भारताने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाजी मारली आणि १-० अशी आघाडी अखेरपर्यंत राखत इतिहास रचला.

भारताचा महान क्रिकेटपटू सुनील गावस्करने १९ एप्रिल १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर २२० धावा फटकावल्या, जे त्याच्या प्रदीर्घ कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक! सुनीलने जवळपास साडे आठ तास किल्ला लढवत २२ चौकारांनिशी २२० धावा फटकावल्यामुळे भारताला ६ दिवसांच्या या कसोटीत ४२७ अशी धावसंख्या उभारता आली. ही कसोटी अनिर्णित राहिली आणि अजित वाडेकरच्या भारतीय संघाने सोबर्सच्या विंडीजचा १-० असा पराभव करून पहिल्यांदा विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

क्विन्स पार्क ओव्हल आणि सुनीलचे अतूट नाते आहे. सुनीलचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण इथेच झाले. ६ मार्च १९७१ रोजी त्याला टेस्ट कॅप मिळाली आणि त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत भारताने विंडीजला पराभूत केले. सुनीलने दोन्ही डावांत अर्धशतके केली. चिखलवाडीत आपल्या मित्रांसोबत खेळताना सुनील आऊट होत नसे आणि तेच चित्र विंडीज दौऱ्यावर दिसून आले. एकाग्रता ही त्याची खासियत. त्यात मुंबईच्या खडूसपणाचे वरदान त्याला लाभलेले होतेच. अशी कवचकुंडले असताना सोबर्सच्या संघाविरुद्ध खेळताना त्याने धावांची टाकसाळच उघडली.

- Advertisement -

पहिल्यावहिल्या कसोटी द्विशतकी खेळीदरम्यान दाढ दुखीने त्याला प्रचंड सतावले, पण वेदनाशमक इंजेक्शन न घेता त्याने खेळण्याचा निर्णय घेतला. सहा दिवसांच्या निर्णायक कसोटीत १६६ धावांच्या पिछाडीनंतर भारतीय संघाचे तारू सुरक्षितपणे किनाऱ्याला लावण्यात सुनील यशस्वी ठरला. त्याला मोलाची साथ मिळाली कर्णधार अजित वाडेकरची. याआधीच्या कसोटीत अजितला फारशा धावा करता आल्या नव्हत्या, पण मालिकेचा निकाल अंतिम कसोटीवर अवलंबून असल्यामुळे आणि सुनीलने एक बाजू खंबीरपणे लावून धरल्यामुळे अजितलाही स्फूरण चढले. त्याने मालिकेतील एकमेव अर्धशतक झळकावताना सुनीलच्या साथीने शतकी भागीदारी रचली.

सहाव्या आणि अखेरच्या दिवशी यजमान विंडीजला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी २६२ धावांचे आव्हान होते. मात्र, हे आव्हान विंडीजला पेलवले नाही. अबीद अलीने सोबर्सला शून्यावरच बाद केले. विंडीजची ४ बाद ५० अशी अवस्था असताना लॉईडने ६४ धावा, तर होलफर्डने ४८ धावा केल्याने विंडीजचा पराभव टळला. गावस्करप्रमाणेच दिलीप सरदेसाई यांनी उत्कृष्ट खेळ करताना या दौऱ्यात ६४२ धावा फटकावल्या.

- Advertisement -

१९६२ च्या दौऱ्यात वेस हॉलने सरदेसाईना सतावले होते. मात्र, १९७१ च्या दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत त्यांना सूर गवसला. भारताचा निम्मा संघ (दुखापतीमुळे सुनील गावस्कर या कसोटीत खेळू शकला नाही) ७५ धावांत गारद झाल्यावर सरदेसाई आणि सोलकर यांनी दमदार शतकी भागी रचली. सोलकरने ६१ धावा करून भारताचा कोसळता डोलारा सावरला. तर सरदेसाईनी आपल्या कारकिर्दीतील दुसरे द्विशतक साजरे केले. त्यांच्या २१२ धावांच्या खेळीमुळे भारताने ३८७ धावांची मजल मारली. बेदी, वेंकट, प्रसन्ना या फिरकी त्रिकुटाने विंडीजचा संघ २१७ धावातच गुंडाळला आणि त्यांच्यावर प्रथमच फॉलोऑनची आपत्ती ओढवली. वाडेकरने सोबर्सला फॉलोऑनबाबत सांगितले, तेव्हा त्याला धक्काच बसला.

तिसरा मुंबईकर एकनाथ सोलकरने भरवशाचा मधल्या फळीतील फलंदाज, तसेच उत्तम क्षेत्ररक्षक असा लौकिक मिळवला आणि प्रसन्ना, बेदी, वेंकट यांना तोलामोलाची साथ देत भारताच्या कसोटी मालिका विजयात मोलाची भर टाकली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या अ‍ॅशेस मालिकेबरोबरच (१९७१) विक्रमादित्य सुनील गावस्करच्या सातत्यपूर्ण खेळाची दखल घेतली गेली. प्रसन्ना, बेदी, वेंकट आणि सलीम दुराणी या फिरकी चौकडीने विंडीजचे ६८ पैकी ४८ बळी टिपून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत दुराणी यांनी सोबर्स, लॉईड यांच्या विकेट काढून सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकवाला. दुराणी आणि जयसिंहा रूम पार्टनर! दुराणीने आदल्या रात्री जयसिंहाला सांगितले की, मी या दोन विकेट काढून देईन. विशेष म्हणजे पहिल्या डावात कर्णधार वाडेकरने दुराणीला गोलंदाजी दिलीच नव्हती. दुसऱ्या डावात दुराणीने जयसिंहामार्फत आपली कैफियत वाडेकरसमोर मांडली आणि आपले शब्द खरे करून दाखवताना सोबर्स आणि लॉईड यांना बाद केले.

१२५ धावा झटपट फटकावत भारताने एक दिवस आणि ७ विकेट राखून दुसरी कसोटी जिंकली व मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेऊन ती अखेरपर्यंत टिकवली. याआधी पतौडीच्या संघाने १९६८ मध्ये न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्येच ३-१ असा पराभव करून परदेशात प्रथम मालिका जिंकली होती. मात्र, न्यूझीलंड, भारत आणि पाकिस्तान यांची त्यावेळी (६० च्या दशकाची अखेर) लिंबू-टिम्बू संघांमध्ये गणना केली जात असे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे कसोटी क्रिकेटच्या छोट्या दुनियेतील (सहा संघ) तीन अव्वल संघ होते. मात्र, भारतीय संघाने आधी विंडीज, मग इंग्लंड या दोन प्रबळ संघांना त्यांच्याच देशात हरवून ‘रबर’ पटकावला आणि वाडेकरने निवड समितीचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी त्याला भारताचा कर्णधार बनवण्यासाठी दिलेल्या निर्णायक मताचा कौल सार्थकी लावला.

गावस्कर ‘द रियल मास्टर’

भारतीय संघाने १९७१ मध्ये विंडीजविरुद्ध विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि भारताच्या या ऐतिहासिक विजयात सुनील गावस्करची भूमिका सर्वात महत्वाची होती. आपल्या पदार्पणाच्या मालिकेत सुनीलने चार सामन्यांत १५४.८० च्या सरासरीने तब्बल ७७४ धावा फटकावल्या. त्याने त्याच्या झुंजार फलंदाजीने अगदी विंडीजच्या चाहत्यांचीही मने जिंकली. लॉर्ड रिलेटर या गायकाने सुनीलसाठी (कॅलिप्सो) गौरव गीत रचले, ज्याच्या ओली होत्या…

It was Gavaskar, The real master Just like a wall,

We couldn’t get Gavaskar at all, not at all,
You know the West Indies, couldn’t out Gavaskar at all.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -