घरक्रीडा‘विराटने कसोटी क्रिकेट खेळू नये!’ संजय मांजरेकरांची पाच वादग्रस्त विधाने, वाचून व्हाल...

‘विराटने कसोटी क्रिकेट खेळू नये!’ संजय मांजरेकरांची पाच वादग्रस्त विधाने, वाचून व्हाल अचंबित

Subscribe

मांजरेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि वेगळ्या मतांमुळे बरेचदा अडचणीत सापडतात.

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणत्याही क्रिकेटपटूविषयीचे आपले मत मांडायला ते घाबरत नाहीत. परंतु, त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणा आणि वेगळ्या मतांमुळे ते बरेचदा अडचणीत सापडतात. त्यांच्या वादग्रस्त विधानांची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होते. तसेच त्यांनी ज्या खेळाडूविषयी आपले मत मांडले आहे, त्यांनासुद्धा प्रतिक्रिया देणे भाग पडते. मांजरेकर यांनी भारताकडून ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामने खेळले असून ते अनेक वर्षे समालोचन करत आहेत. त्यांनी समालोचन करताना किंवा एखाद्या क्रिकेटविषयक कार्यक्रमात केलेली विधाने बरेचदा वादग्रस्त ठरतात. मांजरेकर यांनी केलेल्या पाच वादग्रस्त विधानांवर एक नजर…

अश्विन ‘ऑल टाइम ग्रेट’ नाही

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७८ सामन्यांत ४०९ विकेट घेतल्या आहेत. मात्र, अश्विनला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये फारशा विकेट मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना अजून अश्विनचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, असे काही दिवसांपूर्वी मांजरेकर म्हणाले होते. ‘ऑल टाइम ग्रेट’ (क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक) ही क्रिकेटपटूला मिळणारी सर्वात मोठी पदवी आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावस्कर, तेंडुलकर, विराट आदींना मी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानतो, असे मांजरेकर म्हणाले होते.

- Advertisement -

एकदिवसीय संघात जाडेजा नको 

मांजरेकर यांनी २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या वेळी भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला ‘बिट्स अँड पिसेस’ खेळाडू म्हणून संबोधले होते. फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एका गोष्टीत तरी प्राविण्य नसलेल्या खेळाडूंचा मी चाहता नाही. कसोटी क्रिकेटमध्ये जाडेजा एक अप्रतिम फिरकीपटू आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी असो की गोलंदाजी, तो फारसे योगदान देत नाही. त्याच्या जागी मी एखाद्या फलंदाजाला संधी देईल, असे मांजरेकर म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर स्वतः जाडेजानेच ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिले होते.

पोलार्डला डोकं नाही

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू किरॉन पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक मानला जातो. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पोलार्ड सहसा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु, एका सामन्यात तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि ही गोष्ट मांजरेकरांना फारशी आवडली नव्हती. वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आवश्यक डोकं पोलार्डला नाही, असे वादग्रस्त विधान मांजरेकर यांनी केले.

- Advertisement -

विराटने कसोटी क्रिकेट खेळू नये 

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. परंतु, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला विराटला कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. भारतीय संघ २०११-१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी विराटला धावांसाठी झुंजावे लागत होते. त्यामुळे त्याला पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून वगळण्यात येईल अशी चर्चा सुरु होती. त्यावेळी ‘विराटला आणखी एक कसोटी सामना खेळण्याची संधी दिली पाहिजे, कारण त्यानंतर विराटने कसोटी क्रिकेट खेळू नये हे स्पष्ट होईल,’ असे खोचक विधान मांजरेकर यांनी केले होते.

हार्दिक फलंदाज म्हणून खेळू शकत नाही 

हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याला सातत्याने गोलंदाजी करणे शक्य होत नाही. त्यामुळे यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची केवळ फलंदाज म्हणून भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, हार्दिक केवळ फलंदाज म्हणून खेळू शकत नाही, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले होते. खेळाडूची निवड संघात निवड करण्यासाठी माझा एक निकष आहे. तुमच्याकडे फलंदाज किंवा गोलंदाज असेल, तर तुम्ही अष्टपैलू खेळाडूच्या आधी त्या खेळाडूची निवड केली पाहिजे. हार्दिक पांड्याला मी संघात स्थान देणार नाही, असे मांजरेकर म्हणाले होते. हार्दिकने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन पैकी दोन सामन्यांत ९० हून अधिक धावा केल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -