घरक्रीडाचार दिवसीय कसोटीबाबत इतक्यातच भाष्य नाही - गांगुली

चार दिवसीय कसोटीबाबत इतक्यातच भाष्य नाही – गांगुली

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २०२३ सालापासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सामने पाचऐवजी चार दिवसांचे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. तसे केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सुकर होईल, अशी आयसीसीला आशा आहे. २०२३ ते २०३१ या कालखंडात चार दिवसांचे कसोटी सामने व्हावेत, असा प्रस्ताव आयसीसीच्या क्रिकेट समितीकडे विचाराधीन आहे. आयसीसीच्या अधिकाधिक स्पर्धा व्हाव्यात आणि बीसीसीआयच्या मागणीनुसार द्विपक्षीय मालिकांची संख्या वाढावी, यादृष्टीने चार दिवसीय कसोटी सामने खेळवण्याचा आयसीसी विचार करत आहे. याआधी इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात मागील वर्षी, तर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात २०१७ मध्ये चार दिवसीय कसोटी सामना झाला होता. आयसीसीच्या या प्रस्तावावर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भाष्य करणे टाळले.

आम्हाला आधी आयसीसीचा प्रस्ताव काय आहे, हे पाहावे लागेल. सुरुवातीलाच या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. चार दिवसांच्या कसोटीबाबत पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय मी प्रतिक्रिया देणार नाही, असे गांगुली म्हणाला. काही दिवसांपूर्वीच मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २४७ धावांत पराभव केला होता. हा सामना चार दिवसांतच संपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला चार दिवसांच्या कसोटीबाबत विचारणा झाली होती. मात्र, हा प्रस्ताव त्याला फारसा आवडला नव्हता. कसोटी सामना चार दिवसांचा झाला, तर आपल्याला निकाल मिळणार नाहीत. अ‍ॅशेसमधील प्रत्येक सामन्याचा निकाल पाचव्या दिवशीच लागला होता. पाच दिवसांच्या सामन्यात खेळाडूचा मानसिक आणि शारीरिकदृष्टया कस लागतो, असे पेनने सांगितले.

- Advertisement -

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा!

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत ईसीबीचा अधिकारी म्हणाला, क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमावर मात्रा म्हणून चार दिवसीय कसोटी सामने हा पर्याय असू शकेल. क्रिकेट हा जागतिक खेळ असून खेळाडूंवरील ताण कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आमचा चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा आहे. कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि मुख्य प्रकार आहे. त्यामुळे खेळाडू, चाहते आणि इतर लोक हा बदल सहजासहजी स्वीकारणार नाहीत याचीही आम्हाला कल्पना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -