चौथी ॲशेस कसोटी अनिर्णित; ऑस्ट्रेलियाची व्हाईटवॉशची संधी हुकली

अ‍ॅशेस मालिकेतील चौथी कसोटी अत्यंत रंगतदारपणे अनिर्णित राहिली. नऊ विकेट्स गमावूनही, तळातील फलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या धाडसी कामगिरीमुळे इंग्लंडने रविवारी पाचव्या दिवशी सामना अनिर्णित ठेवला. कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे ऑस्ट्रेलियाची व्हाईटवॉशची संधी हुकली. मात्र, ही कसोटी अनिर्णित राहूनही ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने पुढे आहे. पण सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ पॉइंट टेबलमध्ये घसरण झाली आहे.

सिडनीत पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद २९ अशी मजल मारली होती. पण पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स यांनी चांगली गोलंदाजी करत इंग्लंडची दाणादाण उडवली. शेवटच्या दिवशीची शेवटच्या दोन षटकात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड झुंज देत होते. या दोघांनी ही दोन्ही षटके खेळून काढत सामना अनिर्णित ठेवला.

या सामन्यात इंगल्ंडकडून अष्टपैलू बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली. पहिल्या डावात बेअरस्टोने ११३ धावांची शतकी खेळी करत संघाला सुस्थितीत आणण्यास मदत केली. त्याला बेन स्टोक्सची साथ मिळाली. बेन स्टोक्सने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱअया डावात स्टोक्सने ६० आणि बेअरस्टोने ४१ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ३८८ धावांची गरज होती, पण संघ ९ विकेट गमावून केवळ २७० धावा करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रावलीने सर्वाधिक ७७ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात १३७ आणि १०१ धावांची शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत स्कॉट बोलंडने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले. सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ३-० ने आघाडीवर आहे.


हेही वाचा : NZ v BAN 2nd Test : डेव्हॉन कॉनवेने रचला इतिहास, पाच कसोटी सामन्यांमध्ये झळकावलं अर्धशतक