French Open : राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक; जोकोविचशी सामना होण्याची शक्यता

फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्याची ही नदालची विक्रमी १४ वी वेळ ठरली.

rafael nadal
राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्याची ही नदालची विक्रमी १४ वी वेळ ठरली. त्याने याआधी विक्रमी १३ वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले आहे. त्याने मागील वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्यासमोर पुन्हा जोकोविचचे आव्हान असू शकेल. परंतु, त्याआधी जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या माटेयो बेरेटीनाचा पराभव करावा लागेल. यंदा नदाल १४ व्यांदा, तर जोकोविच दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.

२०१९ नंतर पहिल्यांदा सेट गमावला 

तिसऱ्या सीडेड नदालने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दहाव्या सीडेड अर्जेंटिनाच्या दिएगो स्वात्झमनचा ६-३, ४-६, ६-४, ६-० असा पराभव केला. नदालने या सामन्याची दमदार सुरुवात करताना पहिला सेट ६-३ असा जिंकला. परंतु, दुसरा सेट त्याने ४-६ असा गमावला. फ्रेंच ओपनच्या कोणत्याही फेरीत सेट गमावण्याची ही नदालची २०१९ नंतर पहिलीच वेळ ठरली. परंतु, त्यानंतर त्याने त्याचा खेळ उंचावत तिसरा आणि चौथा सेट सहजपणे जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

त्सीत्सीपास-झ्वेरेव आमनेसामने 

ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासनेही फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्सीत्सीपासने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या सीडेड रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा ६-३, ७-६, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्याची ही त्सीत्सीपासची सलग दुसरी वेळ ठरली. आता त्याचा उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना होईल.